बोगस डॉक्टरांच्या क्लिनिकवर कठोर पावले उचलणार : आरोग्य मंत्री
बेळगाव लाईव्ह : राज्यात बोगस डॉक्टरांच्या क्लिनिकवर कडक कारवाई करण्याचा सरकारने निर्धार केला आहे, अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री दिनेश गुंडूराव यांनी विधान परिषदेच्या अधिवेशनात दिली.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री दिनेश गुंडूराव यांनी आज विधान परिषदेच्या अधिवेशनात सदस्य गोविंद राजू यांच्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, राज्यात नकली डॉक्टरांच्या क्लिनिकवर कारवाईसाठी के.पी.एम.ई. सुधारणा कायद्याच्या (2017) कलम 5 नुसार कठोर उपाययोजना करण्यात येतील.
राज्यात कोणत्याही खाजगी वैद्यकीय संस्थेची नोंदणी के.पी.एम.ई. कायद्यानुसार करणे बंधनकारक आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वैद्यकीय केंद्रांवर कारवाईसाठी प्रत्येक जिल्ह्यात “नोंदणी व तक्रार प्राधिकरण” स्थापन करण्यात आले आहे. या प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असतील. तसेच, जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी (सदस्य सचिव), जिल्हा आयुष अधिकारी, भारतीय वैद्यकीय संघटनेचा एक प्रतिनिधी, आणि एका महिला प्रतिनिधीचा समावेश या समितीत करण्यात आला आहे.
मंत्री गुंडूराव यांनी माहिती दिली की, जानेवारी 2021 पासून आतापर्यंत कोलार जिल्ह्यात 134 नकली डॉक्टरांच्या क्लिनिकवर छापे टाकण्यात आले आहेत. त्यापैकी 16 क्लिनिक सील करण्यात आले असून, 8 प्रकरणांमध्ये पी.सी.आर. नोंद झाली आहे. एका प्रकरणात एफ.आय.आर दाखल करण्यात आली असून, 7 प्रकरणे चौकशीच्या टप्प्यावर आहेत. उर्वरित 102 क्लिनिक बंद करण्यात आले असून त्यांच्यावर कारवाई केली जात आहे.
मंत्री दिनेश गुंडूराव यांनी विधान परिषदेत स्पष्ट केले की, राज्यभरातील नकली डॉक्टरांच्या क्लिनिकविरोधात कठोर पावले उचलली जातील. कोणत्याही व्यक्तीने वैद्यकीय व्यवसाय सुरू करण्यापूर्वी के.पी.एम.ई. नोंदणी प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे, याबाबत जनतेत जागृती निर्माण करण्याचेही सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.