बेळगाव लाईव्ह : महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव येथे झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनानाल १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने बेळगावमध्ये शतकमहोत्सवी अधिवेशनानिमित्त कार्यकारणी समितीची बैठक बेळगाव मध्ये पार पडली. या बैठकीत पाच महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असून काँग्रेस पक्ष बळकटीकरणासहित विविध प्रस्तावांना मान्यता देण्यात आल्याचे काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सांगितले.
बैठकीनंतर बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. १३२ काँग्रेस कार्यकारिणी सदस्यांच्या उपस्थितीत तब्बल ४ तास चाललेल्या बैठकीत ५ महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असून महात्मा गांधींची तत्वे, नवसत्याग्रह बैठक यासह काँग्रेस पक्ष बळकटीकरणासाठी उपक्रम, सृजन कार्यक्रम, पक्ष बळकटीकरणासाठी प्रत्येक स्तरावर निर्णय घेणे,
पक्ष अधिक प्रभावशाली आणि मजबूत करण्यासाठी ब्लॉक मंडळाची स्थापना, जय बापू, जय भीम, जय संविधान रॅलीचे आयोजन, बेळगावमध्ये सुरु झालेले हे अभियान विशाल रॅलीच्या माध्यमातून २६ जानेवारी २०२५ रोजी महू येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मभूमीत पोहोचविणे, भारत जोडो मुळे काँग्रेसला मिळालेल्या नवसंजीवनीमुळे संविधान वाचविण्यासाठी २६ जानेवारी २०२५ ते २६ जानेवारी २०२६ पर्यंत देशभरातील कानाकोपऱ्यात काँग्रेस वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत ‘संविधान बचाव राष्ट्रीय पदयात्रा’ तसेच एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात गुजराथमध्ये सुमारे आयसीसीचे भव्य राष्ट्रीय अधिवेशन अशा विविध कार्यक्रमांचे निर्णय घेण्यात आल्याचे जयराम रमेश यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल यांनीही विविध विषयावर चर्चा केली. ‘एक देश एक निवडणूक’ या विषयावर बोलताना ते म्हणाले, १७ जानेवारी २०२४ रोजी रामनाथ कोविंद यांना पत्र लिहिले होते. काँग्रेस पक्ष या धोरणाचा निषेध करते. संविधान आणि लोकशाहीच्या विरोधात असलेल्या या धोरणाच्या विरोधात काँग्रेस असून हरियाणा आणि महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोपही त्यांनी केला.
यासंदर्भात निवडणूक आयोगालाही अनेक निवेदने देण्यात आली निवडणूक आयोगाने पारदर्शक कामकाज करणे गरजेचे आहे. यासंदर्भात करण्यात आलेल्या तक्रारींकडेही दुर्लक्ष करण्यात आले आहे. यावेळी त्यांनी, निवडणूक आयोगाची पारदर्शकता हरवल्याची टीकाही केली. अनेकवेळा मागणी करूनही मतदार याद्या न पुरविणे हा देखील याचाच एक प्रकार असल्याचे ते म्हणाले.