बेळगाव लाईव्ह : हलगा सुवर्ण विधानसौधमध्ये आजपासून कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले असून पहिल्याच दिवशी वक्फ बोर्ड, पंचमसाली आरक्षण आणि अनुभव मंडपावरील तैलचित्राच्या मुद्द्यांवरून सभागृहात गोंधळ निर्माण झाला.
विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांत चर्चेच्या मुद्यावरून चांगलाच कलगीतुरा रंगला. विरोधकांनी वक्फ, पंचमसाली आंदोलन या विषयावरून चर्चेची मागणी केली. तर सत्ताधार्यांनी विषय पत्रिकेनुसार अनुभव मंडप, प्रश्नोत्तर तासांची मागणी केली.
त्यामुळे विरोधकांनी आक्रमक होऊन विधानसभा अध्यक्षांच्या समोरील मोकळ्या जागेत आंदोलन सुरू केले. त्यामुळे अध्यक्षांना दोन तास कामकाज तहकूब करावे लागले. विरोधी पक्ष भाजपने वक्फ बोर्ड व पंचमसाली समाजाच्या आंदोलनांवर चर्चा करण्याची मागणी केली, तर सत्ताधारी गटाने अनुभव मंडपाच्या विषयक चर्चेवर भर दिला.
विधानसभा अध्यक्ष यू.टी. खादर यांनी अधिवेशनाच्या सुरुवातीला मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर अनुभव मंडप या तैलचित्राबाबत माहिती देण्यास सुरुवात केली. मात्र, यावर भाजप आमदारांनी आक्षेप घेत, वक्फ बोर्ड आणि लिंगायत समाजाच्या आंदोलनावरील निर्बंधांवर आधी चर्चा करण्याची मागणी केली. विरोधकांच्या या मागणीला सत्ताधारी गटाने विरोध केला आणि भाजप व आरएसएस हे बसवेश्वरविरोधी असल्याचा आरोप केला.
सत्ताधारी व विरोधकांच्या या वादामुळे सभागृहात मोठा गोंधळ उडाला. विरोधी पक्षातील सदस्य सुनीलकुमार, अरविंद बेल्लद, अरग ज्ञानेंद्र, बसवराज पाटील-यत्नाळ आणि सिद्धू सवदी यांनी अध्यक्षांच्या समोरील मोकळ्या जागेत आंदोलन सुरू केले. यामुळे सभागृहातील वातावरण आणखी तापले.
संसदीय कार्यमंत्री एच.के. पाटील यांनी अनुभव मंडपाच्या तैलचित्राचे कौतुक करत राज्य सरकारचे अभिनंदन केले, तर भाजप आमदारांनी सरकारवर लोकांचे अधिकार हिरावल्याचा आरोप केला. या गोंधळामुळे अध्यक्षांनी दोन तासांसाठी सभागृहाचे कामकाज तहकूब करण्याचा निर्णय घेतला.
सभागृहातील वादावरून अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी व विरोधकांमध्ये प्रखर वादविवाद पाहायला मिळाला. यामुळे अधिवेशनाच्या आगामी दिवसांमध्ये वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे.