बेळगाव लाईव्ह :हलगा-मच्छे बायपासप्रकरणी सातव्या दिवाणी न्यायालयाने शेतकऱ्यांचा एक दावा मंगळवारी फेटाळला. त्यामुळे शेतकऱ्यांना धक्का बसला असून, या निकालाविरोधात महिनाभरात वरिष्ठ दिवाणी न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यासमोरील एक अडथळा दूर झाल्यामुळे बायपास कामाचा वेग वाढणार आहे.
हलगा-मच्छे बायपासचा झिरो पॉईंट निश्चित झाल्याशिवाय या रस्त्यावरून कोणतीही रहदारी करण्यात येऊ नये, रस्ता वापरण्यात येऊ नये, असा दावा शेतकऱ्यांनी सातवे अतिरिक्त दिवाणी न्यायालयात दाखल केला होता.
या दाव्यावर आज अंतिम सुनावणी झाली. त्यामध्ये न्यायालयाने शेतकऱ्यांचा हा दावा फेटाळून लावला. दावा फेटाळताना कोणती कारणे दिली आहेत, याबाबत अद्याप सविस्तर माहिती वकिलांना मिळालेली नाही; पण महिनाभराच्या आत या निकालाविरोधात वरिष्ठ दिवाणी न्यायालयात दाद मागण्याची मुभा न्यायालयाने दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागून आहे.
न्यायालयात शेतकऱ्यांचा मूळ दावा कायम आहे. जोपर्यंत झिरो पॉईंट निश्चित होत नाही, तोपर्यंत बायपास करण्यात येऊ नये, हा दावा न्यायालयात कायम आहे. पण, झिरो पॉईंट निश्चित झाल्याशिवाय रस्ता वापर करण्यात येऊ नये, या दावा न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर अडचणी वाढल्या असल्या तरी महिनाभरात पुन्हा न्यायालयात जाऊन दाद मागण्यात येणार आहे, असा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे.
विधिमंडळ अधिवेशन काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी शेतकऱ्यांची बैठक घेऊन शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, अशी ग्वाही दिली होती.
तर भूसंपादन अधिकारी बलराम चव्हाण यांनी बायपासची पाहणी केली होती. पण, आता न्यायालयाने शेतकऱ्यांचा एक दावा फेटाळून धक्का दिला आहे. पण, शेतकऱ्यांनी पुन्हा न्यायालयीन लढा देण्याचा निर्धार कायम ठेवला आहे.