बेळगाव लाईव्ह : बेळगाव ते व्हाया कित्तूर धारवाड नव्या रेल्वे मार्गाचे भूसंपादन राज्य सरकारने सुरु केले असून याविरोधात या भागातील शेतकऱ्यांनी आपला विरोध कायम ठेवला आहे.
सदर रेल्वे मार्ग रद्द करून पर्यायी मार्गाचा विचार करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत असून या पार्श्वभूमीवर येत्या हिवाळी अधिवेशनादरम्यान आंदोलन करण्याची तयारी येथील शेतकऱ्यांनी सुरु केली आहे. यासंदर्भात येथील शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे.
बेळगावहून देसूर, नंदिहळ्ळी, के. के. कोप्प, नागेनहट्टी, प्रभुनगर, गर्लगुंजी, नागेरहाळ, बागेवाडी व्हाया कित्तूर ते धारवाड या मार्गे सध्या नियोजित रेल्वे मार्ग आहे. मात्र, या मार्गावर मोठ्या प्रमाणात सुपीक जमिन आहे.
याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. यासाठी याच मार्गाच्या एक किलोमीटर आसपास असलेल्या व खडकाळ भागातून गेलेल्या जागेतून हा मार्ग बनवावा अशी मागणी शेतकऱ्यांतून जोर धरू लागली आहे. तसेच बिडी, खानापूर, नंदगड, बिडी, कित्तूर, धारवाड हा मार्ग देखील सोयीस्कर आहे. याचाही विचार करावा अशी मागणी शेतकऱ्यांतून करण्यात आली आहे.
सध्या केला जाणारा मार्ग पिकाऊ जमिनीतून जाणार आहे. यामुळे पर्यायी मार्ग शोधावा, अशी मागणी शेतकर्यांच्यावतीने करण्यात येत आहे. आमचा विकासाला विरोध नाही. मात्र, पिकाऊ जमिनीतून जाणाऱ्या मार्गाला विरोध आहे. या रेल्वेमार्गामुळे गरीब आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होणार आहे.
यामुळे येथील शेतकऱ्यांनी दक्षिण पश्चिम रेल्वेच्या संबंधित अधिकाऱ्यांसमोर निवेदन सादर केले आहे. मात्र येथील गावामध्ये आधीच मोठ्या जमिनी खरेदी केलेल्या स्थानिक राजकारण्यांचा त्यांच्यावर प्रचंड दबाव आहे. यामुळे अल्पभूधारक शेतकरी देशोधडीला लागणार असून रेल्वे मार्गप्रकरणी केआयएडीबी आणि रेल्वे विभागाने पुनर्विचार करावा, अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
यासंदर्भात हिवाळी अधिवेशनादरम्यान आंदोलन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगी मागणारे निवेदन देखील येथील शेतकऱ्यांनी सादर केले आहे.