बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यात सर्वत्र सुगीचा हंगाम जोरदार सुरु आहे. भातकापणी, बांधणी, मळणी, पेरणी कामात शेतकऱ्यांची धांदल उडत असून ऐन सुगीच्या काळात ‘फेंगल चक्रीवादळाचा’ वातावरणावर परिणाम जाणवत आहे.
गेल्या पंधरवड्यात देखील ढगाळ वातावरणाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला होता. मात्र ढगाळ वातावरण निवळल्यानंतर सुगी हंगामाला पुन्हा जोर आला आहे. मागील आठवड्यात बेळगावचा पारा खाली घसरला होता. दरम्यान शेतकऱ्यांनी सुगीच्या कामांचा जोर वाढवला होता. मात्र आज सकाळपासून ढगाळ वातावरण असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत यामुळे भर पडली आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘फेंगल’ चक्रीवादळामुळे गेल्या आठवड्याभरात वाढलेली थंडी पुढील आठवडाभरासाठी विश्रांती घेणार आहे. या नव्या चक्रीवादळाने हवेतील आर्द्रता बदलण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर यामुळे काही ठिकाणी अवकाळी पाऊस कोसळू शकतो, असा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या पंधरवाड्यात भातकापणी, बांधणी, मळणी हि खरिपातील सुगी आटोपून रब्बी हंगामासाठी पेरणीही काही शेतकऱ्यांनी केली आहे. चालूवषीचा एकंदरीत हंगाम लक्षात घेता सातत्याने पडणारा पाऊस, वातावरणात होणारे कमालीचे बदल यामुळे खरीप हंगामातील बटाटा, भुईमूग, मिरची, नाचणा, बाजरी, मका, रताळी व इतर भाजीपाला या सर्वच पिकांनी जवळपास हात दिला आहे. मात्र भातपीक चांगले असल्याने शेतकरी थोडा सुखावला होता. परंतु सध्या कापणी आणि मळणीच्या काळातच पुन्हा एकदा पावसाळी वातावरणामुळे शेतकरी भयभीत झाला आहे.
सध्या भात कापणीला जोर आला असून कापणीनंतर लागलीच त्याची बांधणी करणे हेही तितकेच गरजेचे आहे. कापणीनंतर पाऊस झालाच तर या भातपिकाचे मोठे नुकसान होणार. यासाठी बांधणीही करण्यात येत आहे. छोट्या मोठ्या मळण्या सध्या अनेक ठिकाणी सुरू असून ढगाळ वातावरणामुळे अनेक ठिकाणी कापण्यात आलेले भात वळी घालून झाकून ठेवण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. मागील आठवड्यात काही भागात पावसाच्या तुरळक सरी बरसल्या आहेत. तर काही भागात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या आहेत. अनेक ठिकाणी भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या बहुतांशी ठिकाणी कापणी आणि मळणीची धांदल सुरु असतानाच रविवारी दुपारपासूनच ढगाळ वातावरण झाले आहे.
काही ठिकाणी यंत्राने तर काही ठिकाणी मजुरांच्या सहकार्याने सुगीची कामे आटोपण्यात येत आहेत. मात्र कामासाठी मजूर वर्गाचा तुटवडा भासत असल्याने शेतकऱ्यांच्या समस्येत आणखीनच भर पडली आहे. ढगाळ वातावरणामुळे काही ठिकाणी शेतीची कामे ठप्प तर काही ठिकाणी संथगतीने सुरु आहेत.
उशीर झाल्यास पुन्हा भात खाली झडण्याचा धोकाही आहे. यामुळे भात कापले तर पावसाचे संकट तसेच न कापले तर झडण्याचे संकट शेतकऱ्यांपुढे उभे ठाकले आहे. ढगाळ वातावरण असेपर्यंत अशीच स्थिती राहणार आहे. पाऊस झाल्यास हाता-तोंडाला आलेली पिके खराब होण्याचा धोका शेतकऱ्यांना आहे.