बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहर परिसरातील शेतकऱ्यांनी आज सोमवारी सकाळी हालगा -मच्छे बायपास रस्त्याच्या निर्मितीला तीव्र विरोध करत माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांची जयंती अर्थात राष्ट्रीय कृषि दिन साजरा केला. यावेळी बायपासच्या ठिकाणी सदर प्रकल्प रद्द करावा या मागणीच्या घोषणा देऊन शेतकऱ्यांनी आपली नाराजी प्रकट केली.
शहरातून येणारी वाहने बाहेरून महामार्गाकडे वळविण्यासाठी हालगा -मच्छे बायपासचे काम केले जात आहे मात्र शेतकऱ्यांना विश्वासात न घेता मनमानीपणे बायपासचे काम केले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यातून होत आहे.
सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ असून सातवे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने झिरो पॉईंट निश्चित करण्याचा अधिकार न्यायालयाला असल्याचे म्हटल्याने शेतकऱ्यांना पुन्हा बळ मिळाले आहे. तथापि खटल्याची सुनावणी न्यायालयात सुरू असताना बायपासचे काम हाती घेण्याचा प्रयत्न राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कंत्राटदाराकडून केला जात आहे. आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी गेल्या 15 डिसेंबर रोजी हे काम बंद पडले असले तरी ते पुन्हा कोणत्या क्षणी सुरू होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर परिसरातील शेतकऱ्यांनी आज राष्ट्रीय कृषी दिनानिमित्त हलगा -मच्छे बायपासच्या ठिकाणी जमा होऊन निदर्शने केली. बैल जोड्यांसह रद्द करा, रद्द करा हालगा -मच्छे बायपास रद्द करा या मागणीचा बॅनर हाती धरून शेतकऱ्यांनी सदर रस्त्याच्या विरोधात घोषणाबाजी केली यावेळी बोलताना शेतकरी नेते राजू मरवे म्हणाले की, भारताचे पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांची आज जयंती असून आजचा 23 डिसेंबर हा दिवस संपूर्ण देशातील शेतकरी राष्ट्रीय कृषी दिन म्हणून साजरा करतो.
या भागातील शेतकरी देखील हा दिन दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करतात मात्र देशातील शेतकऱ्याला वाचवायचे असेल तर त्यांच्या पिकाऊ जमिनी सरकारने भूसंपादित न करू नये. तसे झाले तरच खऱ्या अर्थाने कृषी दिन साजरा केल्यासारखे होईल.
तरी केंद्र व राज्य सरकारने याचा गांभीर्याने विचार करून शेतकऱ्यांची तिबार पीक देणारी सुपीक जमीन नष्ट करणारा हालगा -मच्छे बायपास प्रकल्प तात्काळ रद्द करावा, अशी आम्हा शेतकऱ्यांची कळकळीची विनंती आहे, असे मरवे यांनी सांगितले.