बेळगाव लाईव्ह: बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी धरणे सत्याग्रह सुरू केला. या आंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी आंदोलनस्थळी भेट देत शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला.
कर्नाटक राज्य रयत संघ आणि हसीरू सेनेच्या नेतृत्वाखाली बेळगावातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी धरणे सत्याग्रह सुरू केला असून हे आंदोलन दोन दिवस, म्हणजे २६ आणि २७ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे. शेतकरी समुदायाच्या हितासाठी महत्त्वाच्या असलेल्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन उभे करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये डॉ. स्वामीनाथन आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी करणे, शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करणे आणि कर्जवसुलीसाठी तगादा लावण्यावर बंदी आणणे यांचा समावेश आहे. याशिवाय, ग्रामीण भागात १२ तास थ्री फेज आणि रात्री सिंगल फेज वीजपुरवठा सुरू ठेवणे, तसेच शेतकरीविरोधी कायदे मागे घेणे यासारख्या मागण्याही समोर ठेवण्यात आल्या आहेत.
आज सकाळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि आणि जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी धरणे आंदोलनस्थळी भेट दिली. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक जमिनीवर बसले आणि शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. शासन दरबारी त्यांच्या मागण्या सादर करून शक्य तितक्या लवकर उपाययोजना केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. या चर्चेमुळे शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांविषयी समाधान व्यक्त केले आहे.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद आणि अन्य अधिकारी देखील उपस्थित होते. आंदोलक शेतकऱ्यांनी प्रशासनाला त्यांच्या मागण्यांचे गांभीर्य पटवून देत शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन केले.