बेळगाव लाईव्ह :दोन अस्वलांनी शेतात काम करणाऱ्या जोडप्यावर केलेल्या हल्ल्यात एक शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना खानापुर (जि. बेळगाव) तालुक्यातील मान गावामध्ये काल रविवारी घडली.
खानापुर तालुक्यातील कणकुंबी जवळील मान गावात शेतात काम करत असताना एका दाम्पत्यावर दोन अस्वलांनी हल्ला केला. अस्वलाच्या हल्ल्यात सखारामा महादेव गावकर (63) हे गंभीर जखमी झाले असून, अस्वलाने त्यांच्या दोन्ही पायांचे लचके तोडले आहेत.
दोन अस्वलांनी अचानक केलेल्या हल्ल्यामध्ये सुदैवाने वृद्ध सखाराम यांच्या पत्नीचा जीव वाचला. गंभीर जखमी अवस्थेतील सखाराम यांना बेळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सर्व लोक फाउंडेशनचे वीरेश हिरेमठ यांनी दिलेल्या माहितीनुसार अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या वृद्धावर आता रुग्णालयातील डॉक्टर उपचार करत असून रक्तस्त्राव थांबला आहे. तसेच सखाराम यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे.