बेळगाव लाईव्ह : देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन झाले आहे. श्वासोश्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उदारमतवादी आर्थिक धोरणांचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देश-विदेशात हळहळ व्यक्त केली जात आहे.
बेळगाव येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या बैठकीस आलेले काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे तातडीने गुरुवारी रात्री दिल्लीला रवाना झाले आहेत. गुरुवार रात्रीच्या विशेष विमानाने ते दिल्लीला रवाना झालेले आहेत.
डॉ. मनमोहन सिंह गेल्या काही वर्षांपासून प्रकृतीच्या कारणास्तव राजकारणापासून दूर होते. 1991 मध्ये देश आर्थिक संकटाचा सामना करत असताना, अर्थमंत्री म्हणून त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला स्थैर्य देण्यासाठी मोठी भूमिका बजावली.
त्यांनी बाजारपेठ खुली करत खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाचा मार्ग स्वीकारला आणि भारताला आर्थिक प्रगतीच्या मार्गावर नेले. 2004 मध्ये यूपीए सरकारने बहुमत मिळवल्यानंतर, डॉ. मनमोहन सिंह पहिल्यांदा पंतप्रधान झाले. 2008 मध्ये जागतिक आर्थिक मंदीच्या काळात त्यांच्या धोरणांमुळे भारतावर त्याचा मोठा परिणाम झाला नाही. त्यानंतर 2009 मध्ये ते दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाले.
डॉ. मनमोहन सिंह यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी पाकिस्तानातील गाह या गावी झाला. 1947 साली फाळणीच्या वेळी त्यांचे कुटुंब विस्थापित होऊन भारतात आले. पंजाब विद्यापीठातून त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात डॉक्टरेट प्राप्त केली.
1966 ते 1969 दरम्यान त्यांनी संयुक्त राष्ट्रात काम केले. नंतर ते भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयात सल्लागार म्हणून कार्यरत झाले. 1972 ते 1976 या काळात त्यांनी भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनाने भारताच्या राजकीय आणि आर्थिक क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.