Wednesday, December 11, 2024

/

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे राज्यपाल एस एम कृष्णा यांचे निधन

 belgaum

बेळगाव लाईव्ह : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री, परराष्ट्र मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस एम कृष्णा यांचे निधन झाले. पहाटे 2.45 वाजता त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पार्थिव आज मद्दूर येथे नेण्यात येणार आहे.

एस एम कृष्णा यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री, देशाचे परराष्ट्र मंत्री, महाराष्ट्राचे राज्यपाल आणि भारतीय राजकारणात दहा वेगवेगळी पदे भूषविली होती.

1962 मध्ये कृष्णा यांनी मद्दूर विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवून निवडणूक राजकीय जीवनात प्रवेश केला आणि विजयी मिळविला. त्यानंतर ते ‘प्रजा सोशलिस्ट पार्टी’मध्ये सामील झाले. पण 1967 च्या निवडणुकीत ते मद्दूरमधून काँग्रेसच्या एमएम गौडा यांच्याविरुद्ध पराभूत झाले. 1968 मध्ये, तत्कालीन विद्यमान खासदारांच्या निधनानंतर मंड्या लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा पराभव करून राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केला.
1968 च्या पोटनिवडणुकीनंतर ते मंड्या मतदारसंघातून तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले. 1971 आणि 1980 मध्ये त्यांनी काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक जिंकली. मंड्याला काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून वाचवण्यात एसएम कृष्णा यांची भूमिका महत्त्वाची होती.

ते 1999 मध्ये केपीसीसीचे अध्यक्ष होते आणि त्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला विजय मिळवून दिला. त्यानिमित्ताने एस.एम.कृष्णा यांनी काढलेल्या पंचजन्य यात्रेने कर्नाटकच्या राजकारणात काँग्रेसला ताकद दिली. डिसेंबर 2004 मध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्त झालेले कृष्णा यांनी 5 मार्च 2008 रोजी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला. नंतर राज्यसभेवर निवडून आले, ते 22 मे 2009 रोजी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात परराष्ट्र व्यवहार मंत्री झाले.

आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत काँग्रेसमधील एक मजबूत नेता, एसएम कृष्णा यांनी 29 जानेवारी 2017 रोजी काँग्रेसचा राजीनामा दिला आणि मार्च 2017 मध्ये अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री सिद्धरामय्या उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी शोक व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.