बेळगाव लाईव्ह : राज्य सरकारने राज्य ग्राहक आयोगाच्या पीठाची स्थापना करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली असून या पार्श्वभूमीवर बेळगावमधील वकिलांनी विजयोत्सव साजरा केला. ग्राहक हक्कांच्या संरक्षणासाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरणार असल्याचे वकिलांनी नमूद केले आहे.
कर्नाटक राज्य ग्राहक वाद निवाडा आयोगाच्या स्थापनेसाठी १९७० मध्येच मंजुरी मिळाली होती. मात्र, जागेच्या अभावामुळे ही स्थापना रखडली होती. पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या विशेष प्रयत्नांमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी जागा उपलब्ध करून दिली आहे.
आता के. एच. पाटील सभागृहात भाडेतत्त्वावर ग्राहक पीठ सुरू होणार असल्याचे बेळगाव जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष एस. एस. किवडसण्णावर यांनी सांगितले.
बेळगावमध्ये ग्राहक आयोगाचे खंडपीठ सुरू होणार असल्याची बातमी आनंददायी आहे. मागील अधिवेशनात या मागणीसाठी पाच दिवस धरणे आंदोलन करण्यात आले होते.
अखेर याला यश आले असून, कर्नाटक भागातील नऊ जिल्ह्यांना याचा लाभ होणार आहे, अशी माहिती ऍड. एन. आर. लातूर यांनी व्यक्त केली. ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी सरकारने उचललेले हे पाऊल उपयुक्त ठरेल, असा विश्वास उपस्थित वकिलांनी व्यक्त केला.या कार्यक्रमात अनेक वकील सहभागी झाले होते. यावेळी बेळगाव बार असोसिएशनचे वाय के दिवटे, मारुती कामानाचे, सांबरेकर, आधी वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.