बेळगाव लाईव्ह :बेळगावमध्ये 1924 साली झालेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनाचा शताब्दी सोहळा साजरा करण्याची जय्यत तयारी सध्या शहरात करण्यात आली आहे. प्रमुख रस्ते आणि चौकांचे विद्युत रोषणाईने सुशोभीकरण (डेकोरेटिव्ह लाइटिंग) करण्याबरोबरच रस्त्याशेजारी भिंतींवर आकर्षक रंगकाम करण्यात आले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आठवडाभर सुरू ठेवण्यात येणाऱ्या शहरातील डेकोरेटिव्ह लाइटिंगवर कर्नाटक सरकार 8 कोटी रुपये खर्च करणार आहे.
एकंदर कर्नाटक विधिमंडळाचे अधिवेशन आणि महात्मा गांधीजींचे अध्यक्षतेखाली पार पडलेल्या काँग्रेस अधिवेशनाचा शताब्दी सोहळा एकाच वेळी केला जात असल्यामुळे बेळगाव या सीमावर्तीय जिल्ह्यातील उत्साह द्विगुणित झाला आहे. या दोन कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहराला नववधूप्रमाणे सजवले जात असून सुवर्ण विधानसौधची इमारत रंगीबेरंगी दिव्यांनी न्हाऊन निघाली आहे.
म्हैसूर येथील दसरा उत्सवाच्या विद्युत रोषणाची जबाबदारी सांभाळणाऱ्या पथकानेच बेळगाव येथील विद्युत रोषणाच्या सजावटीची जबाबदारी घेतली आहे. शहरातील राणी चन्नम्मा सर्कल, संगोळी रायान्ना सर्कल, श्री कृष्णदेवराय सर्कल, किल्ला तलाव सर्कल आणि शहापूर बसवेश्वर सर्कल या चौकासह शहरातील एकूण 30 हून अधिक चौकांची इलेक्ट्रिक लाइटिंगद्वारे आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
काँग्रेस अधिवेशनाच्या शताब्दी वर्ष कार्यक्रमाचा भाग म्हणून विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सुवर्ण विधानसौध आवारामध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गांधी भारत कार्यक्रमाच्या बोधचिन्हाचे (लोगो) अनावरण केले. त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी गेल्या 9 डिसेंबर रोजी टिळकवाडीतील वीर सौध, रामतीर्थनगर येथील गंगाधरराव देशपांडे स्मारक आणि पिरनवाडी येथील गांधी भवनला भेट देऊन शताब्दी कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, राज्य सरकार वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून महात्मा गांधीजींच्या संदेशांचा प्रसार करणार आहे. गांधीजींच्या जीवनावर आणि त्यांनी केलेल्या संघर्षावर प्रकाश टाकणे, त्याचप्रमाणे देशभक्ती, अहिंसा आणि अस्पृश्यतेचे उच्चाटन यासंदर्भात जनतेत जनजागृती करणे हा वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित करण्याचा मुख्य उद्देश असणार आहे.
महात्मा गांधीजींनी राज्यातील ज्या ज्या ठिकाणी भेटी दिल्या त्या स्थळांचा विकास केला जाईल. गांधीजी ज्या हुदली गावात वास्तव्यास होते त्या ठिकाणी देखील कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला जाईल असे सांगून बेळगाव शहराची आठवडाभर विद्युत रोषणाईने सजावट केली जाईल आणि त्यासाठी 7 ते 8 कोटी रुपये खर्च केले जातील अशी माहिती उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिली.
स्थानिक काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या मते राज्य सरकार आणि काँग्रेस पक्ष 1924 मध्ये झालेल्या ऐतिहासिक अधिवेशनाची पुन्हा आठवण व्हावी या पद्धतीने जय्यत तयारी करत आहे. सदर शताब्दी कार्यक्रमाला राज्यासह राष्ट्रीय पातळीवरील नेते आणि पदाधिकारी हजेरी लावणार आहेत. गांधी भारत कार्यक्रम बेळगाव मध्ये येत्या 26 आणि 27 रोजी साजरा केला जाणार असून या निमित्ताने पिरनवाडी येथील गांधी भवन येथे गांधीजींच्या संदेशाशी संबंधित छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन केले जाणार आहे. त्याचप्रमाणे येत्या 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. काँग्रेस कार्यकारी समितीची बैठक 26 डिसेंबर रोजी आयोजित केली जाणार असून त्यानंतर 27 डिसेंबर रोजी जाहीर सभा घेतली जाईल. काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीला 150 खासदार, 40 ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हजेरी लावतील. काँग्रेस अधिवेशन शताब्दी वर्षाच्या अनुषंगाने बोलताना एका वरिष्ठ हेस्कॉम अधिकाऱ्याने म्हैसूर दसरा मॉडेल पद्धतीने शहराच्या 40 कि.मी. परिघातील रस्त्यांची विद्युत रोषणाई केली जाणार असल्याची माहिती दिली.