बेळगाव लाईव्ह : 27 रोजी होणाऱ्या जाहीर सभेला जय बापू, जय भीम, जय संविधान अधिवेशन असे नाव देण्यात आले आहे, असे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी सांगितले. सीपीएड मैदानावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले, “आम्ही हा परिसर महात्मा गांधी नवनगर म्हणून घोषित केला आहे. 26 रोजी काँग्रेस विहिरीजवळ जवळ काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होणार असून महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली 1924 मध्ये झालेल्या बेळगाव काँग्रेस अधिवेशनाच्या शतकमहोत्सवी अधिवेशनाच्या अध्यक्ष पदावर मूळचे कर्नाटकचे असलेले एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे आहेत, हि कर्नाटकाची अभिमानाची बाब आहे. तत्कालीन अधिवेशनादरम्यान कर्नाटकातील गंगाधर देशपांडे आणि जवाहरलाल नेहरू हे दोघेही त्यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस होते. हे अधिवेशनही त्यांनी बेळगावात घेतले. त्या दिवशी 80 एकर जागेत अधिवेशन झाले. त्याच ठिकाणी आज आमची कार्यकारिणीची बैठक होत आहे, असे ते म्हणाले.
शतकमहोत्सवी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने भव्य सोहळ्याचे आयोजन केले असून हा सोहळा केवळ काँग्रेस पुरता मर्यादित नसून सर्वांचा कार्यक्रम आहे. उद्या होणाऱ्या कार्यकारिणीच्या बैठकीत देशाला बळ कसे देता येईल यावर चर्चा करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात पक्षाचे कार्यकारी समिती सदस्य, देशाच्या विविध राज्यांतील काँग्रेस पक्षाचे माजी मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री, सर्व राज्यांच्या विधानसभेतील पक्षनेते, प्रादेशिक काँग्रेस समिती अध्यक्ष, सर्व खासदार, आमदार, राज्यस्तरीय कार्यकर्ते तसेच जनतेला या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमंत्रण देण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.
1924 च्या अधिवेशनाचे दस्तऐवज पुस्तक स्वरूपात उद्या प्रकाशित केले जाईल. 26 रोजी सकाळी 10 वाजता वीर सौध येथे गांधींच्या पुतळ्याचे अनावरण होईल. त्यानंतर छायाचित्र प्रदर्शन सुरू होईल, खादी मेळा आणि गंगाधर देशपांडे यांचं स्मारक अनावरण, दुपारी 3 वाजता कार्यकारी समितीची बैठक आणि रात्री 7 वाजता भोजन सोहळा असे कार्यक्रमाचे स्वरूप आहे. 27 तारखेला सकाळी 10:30 वाजता सुवर्णसौध येथे गांधींच्या प्रतिमेचे मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्या हस्ते अनावरण करण्यात येईल. मुख्यमंत्री या कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील, तर सभापती म्हणून यु.टी. खादर आणि बसवराज होरट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होईल. सर्व पक्षीय नेत्यांना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमंत्रण देण्यात आले आहे.
बेळगाव अधिवेशनाच्या शतकमहोत्सवाच्या निमित्ताने हेस्कॉमने बेळगाव शहरात आकर्षक विद्युत रोषणाई केली असून राज्यातील नागरिक, विशेषतः कित्तूर कर्नाटक भागातील नागरिकांनी याचा आनंद घ्यावा.
1904 मध्ये शिवनसमुद्रात वीजनिर्मिती सुरू झाली आणि 1924 मध्ये बेळगाव अधिवेशनात बेळगावात दीपप्रज्वलन झाले. त्याचे फोटो आमच्याकडे आहेत. विजयनगरच्या विरुपाक्ष मंदिराच्या मॉडेलचा फोटो उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे यावेळीही विद्युत रोषणाई करण्यात आली आहे, असे ते म्हणाले.