बेळगाव लाईव्ह : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे आज रात्री दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनानंतर राज्यात सात दिवस शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला असून बेळगावमध्ये सुरु असलेल्या काँग्रेसच्या शतकमहोत्सवी अधिवेशनानिमित्त समारंभातील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
२६ आणि २७ डिसेंबर रोजी बेळगावमध्ये १९२४ साली झालेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या शतकपूर्ती निमित्त विविध कार्यक्रम आयोजिण्यात आले होते. यापैकी २६ डिसेंबर रोजी काँग्रेसचे अधिवेशन आणि विविध कार्यक्रम संपन्न झाले. रात्री १०.०० वाजण्याच्या सुमारास डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाचे वृत्त समजताच काँग्रेसने पुढील सर्व कार्यक्रम रद्द केल्याचे जाहीर केले आहे.
निधनाचे वृत्त समजताच बेळगावमध्ये आलेले एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी हे तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे बेळगाव येथील सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री केपीसीसी अध्यक्ष डी के शिवकुमार यांनी दिली आहे.
राज्यात सात दिवसाचा शासकीय दुखवटा तर शुक्रवार 27 रोजी एक दिवस शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. बेळगावातील काँग्रेस अधिवेशनास देशातील विविध राज्यातून पदाधिकारी आलेले आहेत त्यासाठी सीपीएड मैदानावर जाहीर सभा होणाऱ्या त्या ठिकाणी उद्या शुक्रवारी सकाळी 10 : 30 वाजता दिवंगत पंतप्रधान मनमोहन सिंह श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे असेही शिवकुमार यांनी सांगितले.
भारताच्या अर्थव्यवस्थेला उंचीवर नेऊन ठेवणारा नेता हरपला : मंत्री एच. के. पाटील:
भारताचे माजी पंत्रप्रधान मनमोहन सिंग यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. त्यांच्या निधनाने भारताचे मोठे नुकसान झाले आहे. डॉ. मनमोहन सिंग यांनी भारताच्या प्रगतीचे एक उत्तम उदाहरण जगासमोर ठेवले, त्यांच्या जाण्याने भारताचेच नव्हे तर जगाचे मोठे नुकसान झाले आहे, अशा शब्दात मंत्री एच. के. पाटील यांनी डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली.
डॉ. मनमोहन सिंग यांनी भारताला पहिल्या पाच आर्थिक भक्कम देशांपैकी एक बनविले. गरिबी निर्मूलनात मोलाची कामगिरी बजावली. भारताच्या अर्थव्यवस्थेला पहिल्या पाच आर्थिक भक्कम देशांच्या स्थानावर पोहोचविले. अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी विविध योजना राबविल्या. ते केवळ अर्थतज्ज्ञ आणि राजकारणी म्हणून कार्यरत नव्हते तर संपूर्ण जगात त्यांनी आर्थिक सल्लागार म्हणून आपली वेगळी छाप उमटवली. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी देखील त्यांची स्तुती करत ‘ग्रेट इकॉनॉमिस्ट’ असे संबोधले. त्यांच्यामुळे आपल्याला अनेक प्रेरणा मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांच्या जाण्याने केवळ भारताचेच नाही तर संपूर्ण जगाचे मोठे नुकसान झाल्याचे एच. के. पाटील म्हणाले.