बेळगाव लाईव्ह : डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाने शेतकऱ्यांना पुन्हा एकदा अडचणीत टाकले आहे. गुरुवारी दुपारी बेळगाव आणि आसपासच्या भागात पावसाचा हलकासा शिडकावा झाला. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले असून, मळणी, सुगी आणि कापणीच्या कामांवर मोठा परिणाम झाला आहे.
गेल्या आठवड्याभरापासून बेळगाव परिसरात ढगाळ वातावरण आहे. याच वातावरणामुळे दुपारच्या सुमारास अचानक पावसाच्या सरी कोसळल्या. शेतकऱ्यांनी कापणी केलेल्या पिकांच्या मळण्या आणि सुगीचे काम थांबले आहे. उरलेली उभी पिके देखील या पावसामुळे धोक्यात आली आहेत.
दक्षिण भारतात आलेल्या फेंगल चक्रीवादळामुळे मागील आठवडाभरापासून ढगाळ वातावरणच आढळून येत असून हवामान खात्यानेही पावसाची शक्यता वर्तविली होती. गेल्या काही वर्षांपासून डिसेंबर महिन्यात होणारा पाऊस शेतकऱ्यांसाठी मोठा डोकेदुखी ठरत आहे.
या वेळी झालेला पाऊस रब्बी हंगामाच्या पिकांवरही परिणाम करू शकतो. शेतकरी त्यांची उरलेली कामे उरकण्यासाठी हवामान सुधारण्याची वाट पाहत आहेत.