बेळगाव लाईव्ह :दरवर्षीप्रमाणे बेळगाव शहर परिसरात थंडीचा कडाका वाढला असून गुलाबी थंडी अनुभवण्यास मिळत आहे. शहरवासीयांसाठी ही थंडी नवी नसली तरी कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनासाठी बेळगावमध्ये पाहुणे म्हणून आलेले आमदार, मंत्री आणि उच्च पदस्थ अधिकारी सध्या या थंडीचा आनंद लुटताना दिसत आहेत. बेळगावमध्ये आज सोमवारी सकाळी कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 12.4 अंश सेल्सिअस इतके होते.
पावसाळ्यानंतर हिवाळी मोसमाला झालेली सुरुवात आणि अलीकडेच पावसाने लावलेली हजेरी यामुळे बेळगाव शहर परिसरासह ग्रामीण भागातील थंडीत वाढ होऊ लागली आहे. परिणामी पहाटे व रात्री हुडीहूडी अनुभवयास मिळत आहे.
गेल्या आठवड्यात ढगाळ वातावरण आणि पावसाने हजेरी लावली होती. त्या दरम्यान ओसरलेली थंडी आता पुन्हा वाढू लागली असून दुपारच्या वेळी देखील हवेत गारवा जाणवत आहे. पहाटे व रात्री भोसरी थंडी अनुभवास मिळत असून थंडीपासून संरक्षण करण्यासाठी उबदार कपड्याबरोबरच उपनगरासह ग्रामीण भागात शेकोट्याही पेटू लागल्या आहेत बदलत्या हवामानामुळे मानवी जीवनावर परिणाम होऊ लागला आहे. कधी थंडी कधी गरमी, तर कधी ढगाळ वातावरण, तर कधी अचानक पाऊस अशा बदलता वातावरणामुळे आरोग्याच्या समस्याही निर्माण होऊ लागल्या आहेत. मागील आठवड्यात कमी झालेली थंडी आता पुन्हा वाढू लागली आहे.
सध्या बेळगावच्या सुवर्ण विधानसौध येथे कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाच्या निमित्ताने बेळगाव शहरात राज्यभरातील आमदार, खासदार आणि मंत्रीगणांसह उच्चपदस्थ अधिकारी दाखल झाले आहेत. ही सर्व पाहुणे मंडळी सध्या गरिबाचे महाबळेश्वर म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या बेळगाव शहरातील गुलाबी थंडीचा अनुभव घेत आहेत.
काकती येथील मेरीओट हॉटेलसह विविध ठिकाणी वास्तव्यास असलेले राज्यातील लोकप्रतिनिधी आणि उच्चपदस्थ अधिकारी सकाळच्या वेळी कॉलेज रोड, क्लब रोड, कॅम्प परिसर, रेस कोर्स आदी ठिकाणी मॉर्निंग वॉकच्या माध्यमातून बेळगावच्या गुलाबी थंडीसह आल्हाददायक मनप्रसन्न करणाऱ्या वातावरणाचा आनंद लुटताना दिसत आहेत.