बेळगाव लाईव्ह: बेळगावमध्ये कर्नाटक विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला पोलिसांसाठी विशेष बंदोबस्ताची तयारी जोरात सुरू आहे. परगावाहून अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी येणाऱ्या पोलिसांसाठी आरामदायक सोय केली आहे.
यासाठी विश्रांतीच्या सुविधेसाठी तंबूची निर्मिती करण्यात आली आहे. या सुविधांची पाहणी करतांना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी चक्क गादीवर झोपून पाहून, सोय योग्यपद्धतीने करण्यात आली आहे कि नाही याची शहानिशा केली!
पोलिस आयुक्त मार्टिन आणि पोलिस अधीक्षक भीमाशंकर गुळेद यांच्यासमवेत जिल्हाधिकाऱ्यांनी विधानसौध परिसर, अधिकारी – पोलिसांच्या व्यवस्थेची पाहणी केली. गादीवर पडून देखरेख करून पाहणाऱ्या जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या या कार्यशैलीमुळे उपस्थित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी त्यांच्या व्यक्तिगत नजरेतून या सुविधांचा अनुभव घेतला आणि पोलिसांसाठी किती आरामदायक असू शकते हेदेखील तपासले.
अधिवेशनाच्या तयारीसाठी गेल्या महिन्यापासून बैठकांचे आयोजन सुरू झाले असून, यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी विविध विभागांसाठी नेमलेल्या जबाबदाऱ्यांचा तपशील समजून घेतला आहे. याप्रसंगी, पोलिस विभाग, नगरपालिका, आणि इतर संबंधित विभागांचे अधिकारी कार्यप्रणालीवर चर्चा करत आहेत. त्याचबरोबर, पोलिसांच्या विश्रांतीच्या सुविधा आणि बंदोबस्ताबाबत योग्य ते पाऊले उचलले जात आहेत.
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या कार्यपद्धतीचे कौतुकही अनेकांनी केले आहे. त्यांचा योग्य मार्गदर्शनामुळे अधिवेशनाच्या सुरळीत आयोजनासाठी सर्व संबंधित विभाग समन्वय साधत असून अधिवेशन काळात चोख व्यवस्था, योग्य पोलीस बंदोबस्त आणि सुरळीतपणे अधिवेशन पार पाडावे यासाठी सर्वच विभाग तयारीला लागले आहेत.
अधिवेशनाच्या सुरुवातीला सुरक्षेच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर पोलिसांच्या यंत्रणांचा वापर होणार असल्याने, पोलिसांच्या विश्रांतीची आणि इतर सर्व व्यवस्था सुरळीत होण्यासाठी जिल्हाधिकारी स्वतः देखरेख करत असून पोलिस आणि प्रशासनाचा समन्वय उत्तमपणे साधला जाईल, यादृष्टीने जिल्हाधिकारी कार्य करत असल्याचे दिसून येत आहे.