बेळगाव लाईव्ह :कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज बेळगाव येथे भेट देऊन 1924 मध्ये महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या शताब्दी कार्यक्रमांची शेवटच्या टप्प्यातील तयारीची पाहणी केली.
महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ३९वे अधिवेशन 1924 साली बेळगाव येथील टिळकवाडीत पार पडले होते.
त्या ऐतिहासिक स्थळावर असलेल्या वीरसौध येथे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भेट दिली. त्यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या अनावरणाची तयारी तसेच “नव सत्याग्रह बैठकी”ची तयारी तपासली.
त्याचप्रमाणे, त्या अधिवेशनाची आणखी एक आठवण म्हणून प्रसिद्ध असलेल्या “काँग्रेस विहीर” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंपा सरोवराची पाहणीही त्यांनी केली. वीरसौधमधील ३९व्या काँग्रेस अधिवेशनाच्या ऐतिहासिक छायाचित्रांचे प्रदर्शनही मुख्यमंत्र्यांनी पाहिले.
या भेटीदरम्यान मंत्रिमंडळातील मंत्री, खासदार, आमदार तसेच इतर मान्यवरांसह मुख्यमंत्र्यांनी समूह छायाचित्रही काढले. या वेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासमवेत राजकीय सचिव नझीर अहमद, मंत्री डॉ. जी. परमेश्वर, एच. सी. महादेवप्पा, लक्ष्मी हेब्बाळकर, नेते डी. के. सुरेश, माहिती व जनसंपर्क विभागाचे आयुक्त हेमंत निंबाळकर, बेळगाव जिल्हाधिकारी, जिल्हा पंचायत सीईओ आणि इतर मान्यवर उपस्थित होते.