बेळगाव लाईव्ह : ‘राष्ट्रवीर’कार शामराव देसाई यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा ‘राष्ट्रवीर’कार शामराव देसाई स्मृती पुरस्कार ज्येष्ठ नेते, साहित्यिक आणि पत्रकार कॉ. कृष्णा मेणसे यांना देऊन सन्मानित करण्यात आले. ज्योती महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा पार पडला.
यंदा पुरस्काराचे सातवे वर्ष असून हा सन्मान ज्येष्ठ नेते, साहित्यिक आणि पत्रकार कॉ. कृष्णा मेणसे यांना त्यांच्या सामाजिक व साहित्यिक कार्याबद्दल प्रदान करण्यात आला. आजवर डॉ. बाबा आढाव (ज्येष्ठ सामाजिक नेते), माणिकराव उर्फ भाऊसाहेब पोटे (ज्येष्ठ सामाजिक नेते),डॉ. आ. ह. साळुंखे
(महाराष्ट्रातील ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत व लेखक) भाई डॉ. एन. डी. पाटील (माजी आमदार, शिक्षण तज्ञ व शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते) पन्नालाल सुराणा (ज्येष्ठ समाजवादी विचारवंत) डॉ. भारत पाटणकर (पुरोगामी विचारवंत लेखक) आदींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पत्रकारिता, शिक्षण, सहकार आणि समाज सुधारणा क्षेत्रात भरीव योगदान दिलेले ‘राष्ट्रवीर’कार शामराव देसाई यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा पुरस्कार दिला जातो.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि पुरस्कार समिती अध्यक्ष डॉ. जयसिंगराव पवार होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राष्ट्रीय सचिव मंडळाचे सदस्य, लेखक आणि पत्रकार डॉ. भालचंद्र कांगो हे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कॉ. कृष्णा मेणसे यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
ऍड. राजाभाऊ पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. टी. एस. पाटील यांनी सत्कारमूर्तींचा परिचय करून दिला. प्रा. सुरेश पाटील यांनी सुत्रसंचलन आणि आभार प्रदर्शन केले. यावेळी प्राचार्य आनंद कृ. मेणसे, प्राचार्य अनंतराव शा. देसाई, प्रकाश आ. मरगाळे, शिवाजी शा. देसाई, नीला आपटे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.