बेळगाव लाईव्ह :प्रभावी समुदाय सेवेची 25 वर्षे साजरी करणाऱ्या रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम बेळगावतर्फे रोटरॅक्ट क्लब ऑफ वेणुग्राम बेळगावच्या सहकार्याने उद्या शनिवार दि. 28 व रविवार दि. 29 डिसेंबर 2024 रोजी एक अनोखे नाणे आणि कागदी चलन (पैशाच्या नोटा) प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
बिर्ला इंटरनॅशनल स्कूल, बेळगावच्या पाठिंब्याने होणाऱ्या या प्रदर्शनात प्रसिद्ध नाणी शास्त्रज्ञ रो. अरुण कामुले यांनी सूक्ष्मपणे जमा केलेली दुर्मिळ नाणी आणि कागदी पैशांचा अर्थात नोटांचा प्रभावी संग्रह प्रदर्शित केला जाईल.
हे प्रदर्शन म्हणजे इतिहासप्रेमी, नाणे संग्राहक आणि विशेषतः तरुण शिकणाऱ्यांसाठी हा एक रोमांचक आणि शैक्षणिक अनुभव असणार आहे.
रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम बेळगावने आयोजित केलेले नाणे व कागदी नोटांचे प्रदर्शन उद्या 28 व परवा 29 डिसेंबर रोजी टिळकवाडी येथील महावीर भवन येथे होणार आहे.
सदर प्रदर्शन दररोज सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले असणार असून प्रवेश विनामूल्य आहे. या प्रदर्शनाच्या आयोजनाचा प्राथमिक उद्देश शाळकरी मुलांना प्रेरणा आणि शिक्षित करणे हा आहे, त्यांना नाणीशास्त्राचे आकर्षक जग उलगडण्याची आणि विविध कालखंडातील नाणी व चलनात अंतर्भूत असलेला इतिहास समजून घेण्याची अनोखी संधी प्रदान करणे हा आहे.
सदर दोन दिवसीय प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी भारत, 600 बीसी ते अद्ययावत आणि परदेशी नाणी, तर दुसऱ्या दिवशी संस्मरणीय नाणी आणि भारतीय कागदी पैसे आणि संबंधित इतर गोष्टी प्रदर्शनात मांडल्या जातील.