बेळगाव लाईव्ह:जम्मू काश्मीरच्या पुंच्छ जिल्ह्यातील भीषण अपघातात शहीद झालेल्या जवानांच्या पार्थिवांना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज गुरुवारी सकाळी अंतिम मानवंदना दिली.
बेळगाव येथील युद्ध स्मारकाच्या ठिकाणी शहीद सुभेदार दयानंद तिरकण्णवर आणि महेश मारीगोंड यांच्या पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण करून मुख्यमंत्र्यांनी त्यांना अंतिम मानवंदना दिली. त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शहीद जवानांबद्दल गौरवोद्गार काढताना आपल्या राज्यातील हे जवान अपघातात हुतात्मे झाले ही अत्यंत दुःखाची बाब असल्याचे सांगितले.
अपघातात हुतात्मे झालेल्या चारही जवानांच्या आत्म्यास शांती लाभो असे सांगून त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी आहोत असे ते म्हणाले. सरकारकडून नियमानुसार हुतात्म्यांच्या कुटुंबीयांना मिळणारी सर्व ती मदत केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
आमचे चार जवान अपघातात निधन पावले आहेत. दयानंद तिरकण्णवर (बेळगाव), धनराज सुभाष (चिक्कोडी), महेश संगप्प (बागलकोट) आणि अनुप पुजारी (कुंदापूर) यांच्या आत्म्याला शांती लाभो, अशी प्रार्थना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली. तसेच राज्य सरकारकडून शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मदत निधी दिला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, एच. सी. महादेवप्पा, बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ भीमाशंकर गुळेद आदीसह लष्करी अधिकारी, जवान आणि शहीद जवानांचे नातलग उपस्थित होते.