बेळगाव लाईव्ह : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहताना त्यांना जगातील श्रेष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणून गौरवले. त्यांनी भारताच्या आर्थिक विकासात आणि लोकहिताच्या धोरणांमध्ये दिलेल्या योगदानाचे विशेष कौतुक केले.
सीपीएड मैदानावर कर्नाटक प्रदेश काँग्रेसच्या वतीने आयोजित शोकसभेत मुख्यमंत्री सिद्धरामय्या बोलत होते. त्यांनी डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिमत्त्वाची आठवण करून देत त्यांचे मोठेपण अधोरेखित केले. “डॉ. मनमोहन सिंग यांनी अत्यंत साध्या कुटुंबातून येत जागतिक स्तरावर आपले नाव कमावले. त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिक पातळीवर नेऊन पोहोचवले. देशाच्या गरिबांच्या आणि मध्यमवर्गीयांच्या हितासाठी त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. उदारीकरण धोरणाच्या माध्यमातून त्यांनी भारताला आर्थिक संकटातून बाहेर काढले,” असे सिद्धरामय्या म्हणाले.
डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात भारताच्या आर्थिक सुधारणांची पायाभरणी झाली. त्यांनी आहार सुरक्षा कायदा, शिक्षण हक्क कायदा, माहिती हक्क कायदा यांसारख्या मूलभूत हक्कांचा पाया घातला. त्यांच्या धोरणांमुळे देशातील गरिबांचे आर्थिक स्तर उंचावले. “त्यांची शांत आणि संयमी वृत्ती प्रेरणादायक होती. मी त्यांना अनेक वेळा भेटलो आहे. ते नेहमीच इतरांचे मत ऐकून योग्य तो निर्णय घेत असत,” असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
सिद्धरामय्या यांनी डॉ. सिंग यांच्या भारताच्या आर्थिक विकासातील भूमिकेचे विशेष उल्लेख केले. “रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, अर्थमंत्री आणि पंतप्रधान या जबाबदाऱ्यांमध्ये त्यांनी अपार निष्ठा आणि कार्यक्षमतेने काम केले. सोनिया गांधी यांनी आपले पंतप्रधानपद त्यागून देशाच्या नेतृत्वासाठी त्यांची निवड केली होती. दहा वर्षांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात त्यांनी भारताला आर्थिकदृष्ट्या बलवान बनवले,” असे ते म्हणाले. डॉ. मनमोहन सिंग यांनी भारताच्या राज्यघटनेतील मूलभूत अधिकार प्रत्यक्षात आणून देशाला विकासाच्या मार्गावर नेले. आंबेडकर स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या उद्घाटनासाठी मी त्यांना आमंत्रित केले होते. त्यांच्या सखोल ज्ञानामुळे देशातील अनेक आर्थिक समस्या सोडविण्यात यश मिळाले,” असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी त्यांच्या भाषणात नमूद केले.
डॉ. मनमोहन सिंग यांचे योगदान आणि त्यांची भूमिका भारतीय अर्थव्यवस्थेला आणि लोकहिताच्या धोरणांना आकार देणारी होती असे सांगत त्यांच्या स्मृतींना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.