Friday, December 27, 2024

/

शताब्दी सोहळ्याबद्दल ‘यांनी’ केले मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन

 belgaum

बेळगाव लाईव्ह ,:बेळगाव जिल्हा स्वातंत्र्य सैनिक व उत्तराधिकारी संघटनेचे अध्यक्ष स्वातंत्र्य सैनिक राजेंद्र कलघटगी आणि बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज माजी अध्यक्ष विकास कलघटगी यांनी आज सकाळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची सदिच्छा भेट घेऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली 1924 मध्ये काँग्रेस अधिवेशनाचा शताब्दी सोहळा बेळगाव शहरात आयोजित केल्याबद्दल त्यांचे खास अभिनंदन केले.

काँग्रेस अधिवेशनाच्या शताब्दी सोहळ्याचा एक भाग म्हणून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते आज गुरुवारी सकाळी टिळकवाडीतील वीरसौध येथे महात्मा गांधीजींचा पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी वेळेपूर्वीच वीरसौध येथे दाखल झालेल्या मुख्यमंत्र्यांची तिथे हजर असलेल्या राजेंद्र कलघटगी व विकास कलघटगी यांनी भेट घेतली.

तसेच बेळगावमध्ये काँग्रेस अधिवेशनाचा शताब्दी महोत्सव साजरा करत असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले. यावेळी स्वातंत्र्य सैनिक राजेंद्र कलघटगी यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील आपल्या योगदानाची आणि त्याबद्दल आजपर्यंत महनीय व्यक्तींच्या हस्ते झालेल्या आपल्या गौरवाची थोडक्यात माहिती मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना दिली.

यावेळी विकास कलघटगी यांनी बेळगावमधील 1924 च्या काँग्रेस अधिवेशन आयोजनात आपले आजोबा स्वातंत्र्य सैनिक कै. वामन सातवप्पा कलघटगी यांनी दिलेल्या महत्वपूर्ण योगदान मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातले. माझे आजोबा हे त्यावेळच्या बेळगाव व्यापारी संघाचे अध्यक्ष होते. त्याचप्रमाणे बेळगाव पायोनियर बँक आणि बेळगाव डीसीसी बँकेचे संचालक देखील होते. स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग असणाऱ्या माझ्या आजोबांनी झेंडा चौकामध्ये 1905 मध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या समवेत तसेच शहरातील याळगी परिवार, धान्याचे व्यापारी पाटणेकर बंधूआदींच्या सहकार्याने बेळगावातील पहिल्या सार्वजनिक गणपतीची प्रतिष्ठापना करून स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली.

महात्मा गांधीजी यांच्या अध्यक्षतेखाली 1924 मध्ये काँग्रेसचे अधिवेशन झाले. त्यावेळी रामदेव गल्लीत आमच्या घराशेजारी कट्टर काँग्रेस समर्थक गंगाधरराव देशपांडे यांचे घर होते त्यांचे आमच्या घरी येणे -जाणे असायचे. तसेच आमच्या घरासमोर असलेल्या नागनूर स्वामीजींच्या मठात काँग्रेसच्या बड्या बड्या नेत्यांची ये -जा असायची. त्यामुळे माझ्या आजोबांचा काँग्रेसशी निकटचा संबंध निर्माण झाला होता. व्यापारी असल्यामुळे अधिवेशनाच्या आयोजनासाठी निधी गोळा करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. त्याचप्रमाणे अधिवेशनासाठी येणाऱ्या लोकांची खानपानाची सोय करण्याची जबाबदारी देखील त्यांच्याकडे देण्यात आली होती.

त्यामुळे पडद्याआड असले तरी तत्कालीन अधिवेशन यशस्वी करण्यात माझे आजोबा वामन सातवप्पा कलघटगी यांचेही मोठे योगदान होते, अशी माहिती विकास कलघटगी तत्कालीन कागदोपत्री पुराव्यासह दिली. माहिती ऐकून व कागदपत्रे पाहून प्रभावित झालेल्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्वातंत्र्य सैनिक कै. वामन कलघटगी यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.