बेळगाव लाईव्ह :आम्ही ज्या ठिकाणी आंदोलन करणार ती जागा पोलिसांकडून बंद करण्यात येते. त्यामुळे आम्ही यंदा महामेळावा कुठे होणार हे ऐनवेळी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. गनिमी काव्याने आंदोलन करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाने आम्हाला परवानगी दिली नाही तरी आमचा महामेळावा होणारच आहे. त्यासाठी अटक झाली तरी आम्ही माघारी फिरणार नाही. त्यामुळे सर्वांनी आपला विरोध दाखवण्यासाठी महामेळाव्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किनेकर यांनी केले.
रविवारी दुपारी बेळगाव येथील मराठा मंदिरात बेळगाव तालुका आणि शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या संयुक्त बैठकीत बोलताना त्यांनी सदर आवाहन केले आहे.
ते पुढे म्हणाले की गेल्या दोन वर्षांपासून कर्नाटक सरकार महामेळावा होवू नये, यासाठी प्रयत्न करत आहे. शिनोळीत जाऊन आंदोलन करा, असे सांगत आहेत. पण, आमच्यावर केंद्र सरकारने अन्याय केला आहे. सीमाप्रश्न न्यायप्रविष्ठ असताना कर्नाटक सरकार बेकायदा विधीमंडळ अधिवेशन बेळगावात घेत आहे. त्याविरोधात आम्ही बेळगावतच महामेळावा घेणार आहोत.
या बैठकीत अनेकांनी विचार व्यक्त करून 9 जानेवारी रोजी बेळगावातच महामेळावा घेण्यात यावा, अशी विनंती केली. तर महामेळाव्यासाठी समितीने प्रशासनाकडे पाच ठिकाणे सूचविली आहेत.
यावेळी अॅड. अमर यळ्ळूकर, मालोजी अष्टेकर, रणजीत चव्हाण-पाटील, रामचंद्र मोदगेकर, बी. डी. मोहनगेकर, अनिल पाटील, रणजीत हावळाण्णाचे, मदन बामणे, बी. एस. पाटील, श्रीकांत मांडेकर, मोतेस बारदेसकर आदींनी मनोगत व्यक्त केले. बी. ओ. येतोजी, अॅड. एम. जी. पाटील, रमाकांत कोंडुकसकर, आर. के. पाटील, राजू किणयेकर, अंकुश केसरकर, दीपक पावशे आदि उपस्थित होते.
महामेळाव्याची संभाव्य ठिकाणे : वॅक्सिंन डेपो, गोवा वेस सर्कल, धर्मवीर संभाजी महाराज चौक, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, संभाजी महाराज उद्यान, संयुक्त महाराष्ट्राच चौक, हुतात्मा चौक..