बेळगाव लाईव्ह : बेळगाव महानगरपालिकेच्या सभागृहात महापौर सविता कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली आज सर्वसाधारण सभा बोलाविण्यात आली होती. या सभेत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली असून प्रामुख्याने तानाजी गल्ली येथील उड्डाणपूल रद्द करण्याचा प्रस्ताव तसेच क्लब रोड ला बी. शंकरानंद यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मांडून मंजूर करण्यात आला.
नगरसेवक राजू भातकांडे यांनी तानाजी गल्ली येथील उड्डाणपूल रद्द करण्याचा प्रस्ताव सभागृहासमोर मांडला. याला आमदार असिफ सेठ यांनी अनुमोदन देऊन ठराव मंजूर केला. तानाजी गल्ली येथील उड्डाणपुलामुळे अनेक नागरिकांच्या मालमत्तेवर टांगती तलवार आली होती.
यासंदर्भात काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनीही येथील स्थानिक नागरिकांचे म्हणणे ऐकून हा प्रस्ताव रद्द करण्यासंदर्भात हिरवा कंदील दाखविला होता. आज झालेल्या सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव मांडून मंजूर करण्यात आल्यानंतर रेल्वे विभाग आणि जिल्हाधिकाऱ्यांना कळविण्याचे ठरविण्यात आले.
याचप्रमाणे क्लब रोड ला बी. शंकरानंद यांचे नाव देण्यासंदर्भात प्रस्ताव नगरसेवक संदीप जिरग्याळ यांनी सभागृहासमोर मांडला. बी. शंकरानंद यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असून बेळगावमधील क्लब रोड ला त्यांचे नाव देण्यात यावे, असा प्रस्ताव मांडण्यात आला. बी शंकरानंद यांनी ६ वेळा खासदारपद भूषविले होते. तसेच केंद्रीय पेट्रोलियम मंत्री म्हणूनही त्यांनी काम पहिले होते.
हा प्रस्ताव मांडण्यात आल्यानंतर नामनिर्देशित सदस्य रमेश सोनटक्की यांनी क्लब रोडला इतर कोणाचे नाव असल्यास त्याची आधी खातरजमा करून यावर निर्णय घ्यावा, असे सुचविले. यासंदर्भात लक्ष्मी निपाणीकर यांनी लक्ष घालून पुढील निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.