बेळगाव लाईव्ह : ५० लाख विमा रकमेकरिता सख्ख्या भावाने आपल्या मोठ्या भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना बेळगाव जिल्ह्यात उघडकीस आली आहे. ही घटना मूडलगी तालुक्यातील कागल गावाजवळ घडली असून, पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.
मृत व्यक्तीचे नाव हणमंत गोपाळ तळवार (३५) असून, त्याचा सख्खा भाऊ बसवराज तळवार याने आपल्या तीन मित्रांसोबत मिळून या हत्येची कटकारस्थाने रचली होती.
बसवराजने हणमंतच्या नावाने ५० लाख रुपयांचा विमा काढला होता, ज्यामध्ये तो नॉमिनी होता. या रकमेवर हक्क मिळवण्यासाठी बसवराजने आपल्या भावाला संपवण्याचा क्रूर डाव आखला.
घटनेच्या दिवशी, बसवराजने हणमंतला चंदनाची लाकडे आणण्यासाठी सोबतीला येण्याचे सांगत विश्वासात घेतले. त्यानंतर बसवराज आणि त्याच्या तीन मित्रांनी हणमंतला भरपूर मद्यपान करून त्याची हत्या केली.
लोखंडी रॉडने हणमंतच्या डोक्यावर प्रहार करून त्याला ठार करण्यात आले. या गुन्ह्यात बसवराज तळवारसोबतच बापू शेख, ईरप्पा हडगिणाळ आणि सचिन कंटेण्णावर या तिघांचा सहभाग असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. हत्येनंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते.
मात्र, काही कालावधीतच पोलिसांनी त्यांना अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात मृत व्यक्तीच्या विम्याची रक्कम मिळवण्यासाठी आरोपींनी अत्यंत निर्दयीपणे हा कट रचला होता. सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरू आहे.
बेळगाव जिल्ह्यात घडलेल्या या अमानवी हत्याकांडाने परिसरात खळबळ उडवून दिली आहे. पैशाच्या लोभापोटी सख्ख्या भावानेच आपल्या भावाचा जीव घेतल्याची घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. पोलिसांच्या वेगवान तपासामुळे गुन्हेगारांना पकडण्यात यश आले आहे, मात्र या घटनेने अनेकांना हादरवले आहे.