बेळगाव लाईव्ह : वांग्याची शेती योग्य पद्धतीने केल्यास, चांगले उत्पादन घेता येते हे चिक्कोडीतील हजारे शेतकरी बंधूंनी सिद्ध केले आहे. केवळ ३० गुंठ्यात वांगी पिकवून सहा महिन्यांत १५ लाख रुपयांचा भरघोस नफा मिळवणाऱ्या अनिल आणि सुनील हजारे या दोन शेतकरी बंधूंची यशोगाथा सर्वच शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरत आहे.
बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील काडापूर गावातील अनिल आणि सुनील हजारे यांनी आपल्या ३० गुंठे जमिनीत वांगी पिकवून एक नवा आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी १०९३ वांगी प्रजातीची सुमारे २५०० रोपे लावली होती.
सहा महिन्यांतच ४० टन वांगी उत्पादन घेतले आणि त्यातून तब्बल १५ लाख रुपयांचा नफा कमावला. साधारणतः कडधान्य किंवा उसाची शेती करणारे शेतकरी सहसा एका हंगामात २५-३० टन उसाचे उत्पादन घेतात, ज्यातून ७५ हजार ते ९० हजार रुपयांचा नफा होतो.
मात्र, शास्त्रशुद्ध पद्धतीने वांगी पिकवून आम्ही मोठा नफा मिळवला आहे. हजारे बंधूंनी महाराष्ट्रातील इचलकरंजी, सांगली आणि कोल्हापूर येथे वांग्यांना चांगली मागणी असल्याचा अभ्यास करून आपल्या शेतीत वांगी लावण्याचा निर्णय घेतला.
या मेहनतीमुळे त्यांनी शेतीत मोठे यश मिळवले आहे. शास्त्रशुद्ध पद्धतीने शेती केल्यास चांगले उत्पन्न मिळवता येते अशी प्रतिक्रिया शेतकरी अनिल आणि सुनील हजारे यांनी व्यक्त केली आहे.