बेळगाव लाईव्ह : बेळगावातील सुवर्ण विधानसौध येथे अन्न व पुरवठा मंत्री के.एच. मुनियप्पा यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या दरम्यान बीपीएल कार्ड पुनरावलोकन व पात्रांना वितरणासंदर्भात महत्त्वाचे विधान केले.
राज्यातील बीपीएल (गरीबीरेषेखालील) पातळीवरील शिधापत्रिकाधारकांची ग्रामपंचायत पातळीवर परिपक्व माहिती संकलन करून पात्र लाभार्थ्यांना कार्ड वितरण करण्याचे निर्देश अन्न व पुरवठा मंत्री के.एच. मुनियप्पा यांनी दिले आहेत.
विधानपरिषद सदस्य के.ए. तिप्पेस्वामी यांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना मंत्री मुनियप्पा म्हणाले की, सध्या बीपीएल कार्डधारकांपैकी सुमारे 20 टक्के लोक अपात्र आहेत. त्यांना वेगळे करण्यासाठी योग्य ती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. गरीब जनतेवर अन्याय होणार नाही याची ग्वाही देत, पात्र लाभार्थ्यांची कार्डे कोणत्याही परिस्थितीत रद्द होणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील 65 ते 75 टक्के जनता दारिद्र्यरेषेखाली असून अशा परिस्थितीत, एपीएल कार्डधारकांना अपात्र बीपीएल योजनेतून वगळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात येत आहे. मुनियप्पा यांनी पुढे सांगितले की, योग्य माहिती गोळा करून पात्र लाभार्थ्यांना नव्याने बीपीएल कार्ड वितरित केले जाईल.
सर्व पक्षांनी सहकार्य केल्यास ही प्रक्रिया अधिक पारदर्शक व यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पात्र बीपीएल कार्ड कोणत्याही प्रकारे रद्द होणार नाहीत याची काळजी घेतली जाईल. पात्र लोकांची बीपीएल कार्डे रद्द झाल्यास त्यांना नवीन कार्ड दिले जाईल, असे ते म्हणाले. सर्वांनी नि:पक्षपातीपणे सहकार्य केल्यास कार्ड रिव्हिजनचे काम यशस्वी होईल, असे उत्तर मंत्र्यांनी बैठकीत दिले.