बेळगाव लाईव्ह : या वर्षी बेळगाव जिल्हा रुग्णालयात 120 नवजात शिशु आणि 11 महिलांचा मृत्यू झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
बळ्ळारीमध्ये दूषित सलाईनमुळे अशाच प्रकारचे मृत्यू घडल्याच्या पार्श्वभूमीवर, भाजपच्या कर्नाटक महिला मोर्चाने या मुद्यावर राज्यव्यापी मोहीम सुरू केली आहे.
गेल्या दोन दिवसांपूर्वी कुंदरगी गावातील पूजा कडकबावी या बाळंतिणीचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मृत महिलेच्या कुटुंबीयांची भेट घेत भाजप महिला मोर्चाच्या राज्य सचिव डॉ. सोनाली सरनोबत, राज्य उपाध्यक्षा शांभवी अश्वथपुरे आणि बेळगाव ग्रामीण महिला अध्यक्ष डॉ. नयना भस्मे यांनी सांत्वन केले.
यावेळी गोकाक भाजप मंडळ अध्यक्ष राजेंद्र गवडपगोळ, आनंद अप्पुगोळ, शिवानंद तोपगी तसेच भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. या दुर्दैवी घटनांमुळे सिव्हिल रुग्णालयांमधील व्यवस्थापन आणि आरोग्य सेवांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.