बेळगाव लाईव्ह : राज्यातील बाळंतिणींच्या मृत्यूंवरून भाजप महिला मोर्चाने भव्य आंदोलन छेडून राज्य सरकारविरोधात तीव्र रोष व्यक्त केला. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि काँग्रेस सरकारच्या निष्क्रियतेवर जोरदार टीका करत सुवर्ण विधानसौधला घेराव घालण्याचा प्रयत्न करण्यात आला.
कर्नाटक राज्यातील बाळंतिणींच्या मृत्यूंवरून भाजप महिला मोर्चाने काँग्रेस सरकारच्या निष्क्रियतेवर तीव्र टीका केली. यासाठी महिला मोर्चाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी बेळगावातील मालिनी सिटी येथे आंदोलन केले आणि नंतर सुवर्ण विधानसौधकडे मोर्चा काढला. भाजपचे राज्याध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी यावेळी काँग्रेस सरकारवर टीका करताना सांगितले की, उत्तर कर्नाटकातील समस्या सोडवण्यासाठी बी. एस. येडियुरप्पा यांनी सुवर्ण विधानसौध उभे केले. मात्र, सध्याचे सरकार येथे पिकनिकसारखे अधिवेशन घेत आहे. मुख्यमंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये अडकले असून, त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा. राज्यात बाळंतिणींचे मृत्यू होत असतानाही मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री याकडे दुर्लक्ष करत आहेत. हे सरकार जनतेच्या जीवाशी खेळत आहे, अशी गंभीर टीका बी. वाय. विजयेंद्र यांनी केली.
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते छलवादी नारायणस्वामी यांनीही काँग्रेस सरकारवर टीका करत सांगितले की, हे सरकार केवळ पैसे कमविण्यात व्यस्त आहे. बाळंतिणी आणि बालकांच्या मृत्यूकडे यांचे लक्ष नाही. मुख्यमंत्री प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी पळ काढत असल्याचे ते म्हणाले. तर सिद्धरामय्या कोणते तेल लावून सभागृहात येतात हे कळत नाही. आम्ही कितीही प्रश्न विचारले तरी उत्तर मिळत नाही, असे नारायणस्वामी म्हणाले.
माजी खासदार मंगला अंगडी बोलताना म्हणाल्या, राज्यात बाळंतिणी आणि बालकांच्या मृत्यूंवर सरकार निष्क्रिय आहे. आरोग्यमंत्री राजीनामा देईपर्यंत आमचा संघर्ष सुरू राहील. बाळंतिणींच्या मृत्यूंचे कारण म्हणजे आरोग्य व्यवस्थेतील हलगर्जीपणा असून याप्रकरणी सरकारने योग्य ती जबाबदारी घेतली पाहिजे, असे अंगडी म्हणाल्या.
माजी मंत्री शशिकला जोल्ले यांनीही सरकारवर गंभीर आरोप करत म्हटले की, महिलांना प्रसूत काळात किंवा गर्भारपणात योग्य उपचार मिळत नाहीत. चुकीच्या औषधांचा वापर यासाठी कारणीभूत ठरत असून याची सरकारने जबाबदारी स्वीकारली पाहिजे. महिलांना आईपण महत्वाचे असते. मात्र, राज्य सरकारच्या बेपर्वाईमुळे बाळंतिणी आणि बालकांचे मृत्यू होत आहेत,असे जोल्ले म्हणाल्या. भाजप नेत्या डॉ सोनाली सरनोबत यांच्यासह बेळगाव शहर परिसरातील ही भाजपच्या महिला कार्यकर्त्या शेकडोच्या संख्येने या आंदोलनात सहभागी झालेल्या होत्या.
यानंतर भाजप महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सुवर्ण विधानसौधकडे मोर्चा नेऊन घेराव घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना थांबवले. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. पोलिसांनी काही महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.