बेळगाव लाईव्ह : भाजपचे विधान परिषद सदस्य आणि माजी मंत्री सी. टी. रवी यांच्या अटकेमुळे बेळगावसह राज्यभर भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी, आणि समर्थकांमध्ये संताप उसळला आहे. त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ आज सकाळी भाजपने कित्तूर चन्नम्मा सर्कल येथे तीव्र आंदोलन छेडले.
यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी राज्य सरकार आणि मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनादरम्यान महिला कार्यकर्त्यांचा सहभाग लक्षणीय होता. कार्यकर्त्यांनी हातात निषेधाचे फलक घेऊन मंत्री आणि सरकारवर टीका केली.
चौकामध्ये मानवी साखळी बनवत रास्ता रोको करण्यात आला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.
प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना भाजप नेते धनंजय जाधव यांनी सांगितले की, आमदार सी. टी. रवी यांच्यावर खोटा आरोप ठेवून त्यांना अटक करण्याचा काँग्रेस सरकारचा हेतुपुरस्सर प्रयत्न आहे. अटकेनंतर त्यांच्यासोबत अतिशय वाईट वागणूक केली गेली.
रात्रभर त्यांना विविध पोलीस ठाण्यांमध्ये फिरवण्यात आले. यामध्ये त्यांना मारहाण होऊन डोक्याला दुखापत झाली, मात्र योग्य उपचार न करता त्यांच्यावर साधे उपचार करण्यात आले. खरे तर अटक केल्यानंतर सी. टी. रवी यांना शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यातच ठेवून आज सकाळी न्यायालयासमोर हजर करावयास हवे होते.
मात्र तसे न करता पोलिसांनी रात्रभर विविध पोलीस ठाण्यांमध्ये फिरवले. त्यानंतर आज सकाळी त्यांना मुतगा येथील आरोग्य केंद्रात नेण्यात आले. या सर्व कालावधीत गुंडांना जशी वागणूक दिली जाते तशा पद्धतीची वागणूक रवी यांना देण्यात आली, असा आरोप त्यांनी केला.
भाजप नेत्या शिल्पा केंकरे यांनी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यावर जोरदार टीका करताना सांगितले की, सी. टी. रवी महिलांचा आदर करणारे नेते आहेत आणि त्यांनी महिलांविरोधात अपशब्द वापरल्याचा आरोप खोटा असल्याचे स्पष्ट केले.
हे आंदोलन काँग्रेस सरकारविरोधातील जनतेचा रोष दाखवणारे होते. भाजप कार्यकर्त्यांनी रवी यांच्या अटकेविरोधात ठामपणे भूमिका घेतली असून, या प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची मागणी केली आहे.