Saturday, January 18, 2025

/

बीम्समधील प्रसूती विभागात पुन्हा भीषण परिस्थिती :

 belgaum

बेळगाव लाईव्ह : गेल्या महिनाभरात जिल्हा रुग्णालयातील प्रसूती विभागातून अनेक तक्रारी पुढे आल्या असून राज्यभरात बाळंतिणीच्या मृत्यू प्रकरणाचे सत्र सुरु असताना बेळगाव जिल्हा रुग्णालयात देखील असे प्रकार पाहायला मिळाले.

महिनाभरात प्रसूती विभागात उपचारासाठी दाखल झालेल्या महिलांमधील तीन महिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून आज पुन्हा एका गर्भवतीच्या महिलेच्या प्रकृतीत बिघाड झाला. दरम्यान यावेळी जिल्हा रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित नसल्याने सदर महिलेला पुढील उपचारासाठी हुबळीच्या किम्स रुग्णालयात तातडीने हलविण्यात आले आहे.

या साऱ्या प्रकारावरून जिल्हा रुग्णालयातील सावळा गोंधळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्हा रुग्णालयाच्या प्रसूती व शिशु आरोग्य विभागात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या एका गर्भवती महिलेची प्रकृती अतिशय खालावली.

महिलेच्या गर्भात बाळाचा मृत्यू झाल्याने सदर महिला जीवनमरणाच्या संघर्षात अडकली. यावेळी जिल्हा रुग्णालयात उपचार करणे शक्य नसल्याने तातडीने महिलेला किम्सच्या दिशेने हलविण्यात आले.Bims

गोकाक तालुक्यातील मेलमट्टी या गावातील रहिवासी राधिका मल्लेश गड्डीहोळी (१९) असे या महिलेचे नाव असून आज सकाळी ४ वाजता प्रसूतीसाठी तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सदर महिलेची प्रकृती बिघडून तिला फिट्स येऊ लागल्या.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला पुढील उपचारांसाठी हुबळी येथील किम्स रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी तिच्यावर मेलमट्टी येथून प्रथम यमकनमर्डीच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, फिट्स येऊ लागल्याने तिला केएलई रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला देण्यात आला. पण, आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथेही डॉक्टरांनी प्रकृती गंभीर असल्याचे सांगत पुढील उपचारांसाठी तिला किम्समध्ये हलवण्याचा सल्ला दिला.

कोविड काळापासून जिल्हा रुग्णालयातील असुविधेचा कारभार अनेकवेळा प्रकाशझोतात आला आहे. मागील काही कालावधीत जिल्हा रुग्णालयातील सुविधा सुधारण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला. मात्र पुन्हा परिस्थिती जैसे थे निर्माण झाली असून कधी सर्व्हर, कधी असुविधा तर कधी डॉक्टरांची अनुपलब्धता यामुळे सामान्य जनता आरोग्य सुविधा मिळविण्यासाठी भरडली जात आहे.

प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांच्या बाबतीत गेल्या महिनाभरात अनेक गंभीर तक्रारी पुढे आल्या असून गर्भवतीच्या, बाळंतिणीच्या मृत्यू प्रकरणी रुग्णालय प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप रुग्णांचे नातेवाईक आणि नागरिक देखील करू लागले आहेत. सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये चांगले उपचार उपलब्ध होण्यासाठी सरकारने पावले उचलावी, रुग्णांची होणारी हेळसांड थांबविण्यात यावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.

यासंदर्भात जिल्हा सर्जन डॉ. विठ्ठल शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले, जिल्हा रुग्णालयात कार्डिओलॉजिस्ट आणि न्यूरोसर्जनची कमतरता असल्याने परिस्थिती गंभीर झाली आहे. तिला योग्य उपचार मिळवून देण्यासाठी आम्ही किम्सकडे पाठवत आहोत. जिल्हा रुग्णालयात दरमहा ७०० ते ८०० प्रसूती होतात, यामुळे डॉक्टरांवरील कामाचा ताण वाढला आहे. वेळेवर दाखल झाल्यास अधिक चांगले उपचार दिले जाऊ शकतात, आम्ही आमच्या सामर्थ्याने मोफत उपचार करून रुग्ण वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत शिवाय रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना उत्तम आरोग्य सेवा पुरविण्यासाठी अनेक बदल देखील करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.