बेळगाव लाईव्ह : बेळगाव-कोल्हापूर या नव्याने रेल्वे मार्गासाठी संकेश्वर भागात सर्वेक्षण सुरू झाले आहे. या रेल्वे मार्ग धारवाड-कित्तूर-बेळगाव मार्गे संकेश्वर कोल्हापूर असा कॉरिडरचा भाग आहे. त्यापैकी सध्या धारवाड-कित्तूर मार्गे बेळगावचे काम सुरू झाले आहे.
२०१२ मध्ये कराड-बेळगाव असा १९१ किलोमीटरचा (सेंट्रल रेल्वे पुणे) सर्व्हे होऊन अहवाल बोर्डाला पाठविण्यात आला होता.
दरम्यान नैर्ऋत्य रेल्वे (हुबळी) यांनी एस्कॉन टेक्नॉलॉजीतर्फे पाच्छापूर-संकेश्वर-कोल्हापूर ८३ किलोमीटर प्राथमिक सर्व्हे असे दोन वेगळे सर्व्हे केले होते.मात्र, नुकतेच रेल्वे बोर्डाने नियोजित मार्गास प्रतितास १६० (ब्रॉडगेज) कि.मी. इतक्या कमाल वेगाने नियोजित रेल्वेसाठी परकनट्टी-संकेश्वर मार्गे कोल्हापूर (८५ कि. मी.) असे प्राथमिक अभियांत्रिकी व ट्राफिक (पीईटी) सर्व्हेेच्या खर्चास ५५ लाखांचा निधी मंजूर केला आहे.
त्यामुळे मोनार्क सर्व्हेयर्स अँड इंजिनिअरिंग कन्सल्टंट लि., पुणेतर्फे सर्व्हे करून मार्किंग करण्यात येत आहे.सध्या संकेश्वर भागात निपाणी येथून कणगला केआयडीबी (गवानी वगळता) सीमेची लक्ष्मी हरगापूर तलाव, अंकलेनजीक चोरगे व पिंपले जमिनीच्या नाल्याजवळून संकेश्वरातील निडसोशी रोड, स्वस्तिक गॅस, गोदाम घाटगे मळा, हौसिंग कॉलनी, कमतनूर रस्त्यात रवंदी शेत, कमतनूर गेट, नेरली दर्गा मार्गे हुक्केरी असा सर्व्हे ड्रोन कॅमेऱ्याद्वारे करण्यात येत आहे.
सर्व्हे झालेल्या ठिकाणी लाल व पांढऱ्या रंगाचे मार्किंग पट्टे मारले जात आहेत.दरम्यान, रेल्वे मार्गात येणाऱ्या नाल्याची लांबी व रुंदी, पाण्याचा प्रवाह यांची माहिती घेण्यात येत आहे.
हा मार्ग उभय राज्यांना वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. यासाठी सर्व्हेचा अहवाल सादर केल्यावर याविषयी अंतिम निर्णय रेल्वे बोर्ड व केंद्र सरकार घेणार आहे. या प्रकल्पास कर्नाटक शासन मोफत जमीन व ५० टक्के निधी देणार आहे.