बेळगाव लाईव्ह : ९ डिसेंबर २०२४ पासून बेळगाव सुवर्णसौध येथे सुरु असलेल्या कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस होता. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमधील खडाजंगीवरून सभागृह गाजले. सभागृहाच्या कामकाजाच्या सुरुवातीलाच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी केलेल्या वादग्रस्त विधानावरून काँग्रेस आमदारांनी भाजपाविरोधात टीकास्त्र सुरु केले. विधानसभेचे कामकाज दुपारी १२.२० पर्यंत उत्तम पद्धतीने सुरु होते. दरम्यान काँग्रेस आमदार आणि भाजप आमदारांमध्ये वादावादी सुरु झाल्यानंतर सभागृह २ तासांसाठी तहकूब करण्यात आले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राज्यसभेत वक्तव्याचा निषेध करत कर्नाटक विधानसभेतील सत्ताधारी गटाच्या आमदारांनी अमित शहा यांच्याविरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यांना विरोध करताना विरोधी पक्षाच्या सदस्यांनीही नेहरूंच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाने डॉ. आंबेडकरांचा निवडणुकीत पराभव केला, अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. या मुद्द्यावरून सभागृहाचे कामकाज तीन वेळा तहकूब करण्यात आले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी केलेल्या वादग्रस्त विधानावरून आज कर्नाटक विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात जोरदार पोस्टर वॉर रंगले. एकीकडे काँग्रेसच्या आमदारांनी डोक्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पोस्टर घेऊन नारेबाजी केली तर दुसरीकडे काँग्रेसविरोधात घोषणाबाजी करत डॉ. आंबेडकरांच्या विचारांविरोधात काँग्रेसची विचारसरणी असल्याचा आरोप भाजप आमदारांनी केला. यामुळे ‘जय भीम, जय आंबेडकर’ या घोषणांच्या आवाजाने कामकाजादरम्यान विधानसभा घुमली.
आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव हे गर्भवती महिलांच्या मृत्यूच्या प्रश्नावर उत्तर देत असतानाच सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी प्रत्येक डेस्कवर डॉ.बी.आर.आंबेडकर यांचे पोस्टर दाखवून अमित शहा यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. त्यांनी अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी केली आणि त्यांना देशातून हद्दपार करण्याचीही मागणी केली. भाजप पक्ष सदैव डॉ.आर.बी.आर. आंबेडकरांच्या विरोधात आहे, अशा घोषणा त्यांनी दिल्या. त्यांना विरोध करत विरोधी गटानेही काँग्रेस पक्षाने डॉ.बी.आर.आंबेडकरांचा पराभव व अपमान केला, काँग्रेस पक्षाने राज्यघटनेविरोधात आणीबाणी आणली, गर्भवती महिलांच्या मृत्यूला काँग्रेस सरकार कारणीभूत आहे, अशी पोस्टरबाजी करत आवाज उठवला. सभापतींच्या आसनासमोर फाटलेले कागदही टाकले.
सभापतींनी प्रथम सकाळी 11.30, नंतर 1.30 आणि 2.30 वाजता अधिवेशन तहकूब केले. विधानसभेत दोन तासांहून अधिक काळ कामकाज झाले नाही. याचदरम्यान विधानपरिषदेचे कामकाज सुरु असताना सी. टी. रवी यांनी उत्तर देण्यासाठी सुरुवात केली. यादरम्यान त्यांनी विरोधी पक्ष गोंधळलेला असल्याचे वक्तव्य केले. सभागृहात सुरु असलेल्या गोंधळात त्यांनी उच्चारलेल्या शब्दाचा अनर्थ ऐकण्यात आल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. मात्र मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आपल्या बोलण्याचा विपर्यास केला असे सी. टी. रवी यांनी सांगितले. एकंदर प्रकारावरून सभागृहाच्या वादावादीत ‘ध’ चा ‘मा’ केल्याची चर्चाही जोरदार रंगली.
अखेर सायंकाळी ५.३० वाजता सभागृहाचे कामकाज सुरु झाले. यावेळी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सभापती बसवराज होरट्टी यांच्याकडे सी. टी. रवी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. यावेळी सभापतींनी सभागृहाचा मान राखण्यासाठी पुढील काळात अशा गोष्टी घडू नयेत, सभागृहाची मानमर्यादा राखावी, सदस्यांनी आत्मवलोकन करावे असे सुचवत सभागृह स्थगित केले.
एकंदर गेल्या ११ दिवसांपासून सुरु असलेल्या विधिमंडळ अधिवेशनात विविध विषयांवर जरी चर्चा झाली असली तरी दरवर्षीप्रमाणे वादावादी, आरोप – प्रत्यारोप झाले. मात्र यंदाही उत्तर कर्नाटकाच्या विकासावर म्हणावी तशी चर्चा झाली नाही. यामुळे नाराजी व्यक्त आहे. अखेरच्या दिवशी अमित शहा यांच्या वादग्रस्त विधानावरून सुरु झालेल्या गोंधळाचा शेवट विधान परिषद सदस्य सी.टी. रवी यांच्या अटकेने होत कर्नाटक विधिमंडळ अधिवेशनाचे सूप जोरदार वाजले….!