बेळगाव लाईव्ह :जम्मू-काश्मीरच्या पुंछजिल्ह्यातील मेंढर क्षेत्राच्या बलनोई भागात सैन्याचे एक वाहन खोल दरीत कोसळल्यामुळे मंगळवारी सायंकाळी घडलेल्या भीषण अपघातात बेळगाव तालुक्यातील पंत बाळेकुंद्री येथील रहिवासी असणारे 11 मराठा लाईट इन्फंट्रीचे सुभेदार दयानंद तिरकण्णवर हे शहीद झाले असल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांना कळविण्यात आली आहे. दयानंद हे सांबरा या गावचे जावई आहेत.
अपघाताचे आणि तिरकण्णवर त्यात निधन पावल्याचे वृत्त हाती येताच पंत बाळेकुंद्री आणि सांबरा गावावर शोककळा पसरली आहे. दयानंद यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
या घटनेत सुभेदार दयानंद तिरकण्णवर (वय 45, रा. सांबरा बेळगाव) यांच्यासह कुंदापुर उडुपी येथील हवालदार अनुप (वय 33), नाईक शुभम घाटगे (वय 28 रा. कामेरी सातारा), जवान अक्षय निकुरे (वय 28 रा. चंद्रपूर महाराष्ट्र) आणि जवान महेश मरिगोंड (वय 25 रा. मुधोळ बागलकोट) हे देखील शहीद झाले आहेत.
जिल्ह्यातील मेंढर क्षेत्राच्या बलनोई भागात नीलम मुख्यालयातून बलनोई घोरा पोस्टच्या दिशेने जात असलेले सैन्य वाहन घोरा पोस्टनजीक दरीत कोसळून दुर्घटनाग्रस्त झाले. वाहन सुमारे 300 ते 350 फूट खोल दरीत कोसळले. या अपघातात अनेक जवान जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच लष्करी अधिकाऱ्यांसह 11 एमएलआयच्या शिघ्र प्रतिसाद पथकाने (क्यूआरटी) घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य हाती घेतले.
त्यांनी जखमी जवानांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. तथापि उपचारादरम्यान 5 जवानांची प्राणज्योत मालवली. ज्यामध्ये दुर्दैवाने पंत बाळेकुंद्रीच्या सुभेदार दयानंद तिरकण्णवर यांचा समावेश आहे.
बुधवारी रात्री उशिरा बेळगाव येथील शहीद जवानांचे पार्थिव मराठा सेंटर येथे आणले जाणार आहे गुरुवारी सकाळी नऊ वाजता सांबरा येथे पार्थिव दर्शनासाठी ठेवल्यानंतर दुपारी अंतिम संस्कार केला जाणार आहे.