बेळगाव लाईव्ह : 1924 साली बेळगावमध्ये झालेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनाचा शताब्दी सोहळा साजरा करण्याची जय्यत तयारी सध्या शहरात करण्यात आली आहे. प्रमुख रस्ते आणि चौकांचे विद्युत रोषणाईने सुशोभीकरण (डेकोरेटिव्ह लाइटिंग) करण्याबरोबरच रस्त्याशेजारी भिंतींवर आकर्षक रंगकाम करण्यात आले आहे.
कर्नाटक विधिमंडळाचे अधिवेशन आणि महात्मा गांधीजींचे अध्यक्षतेखाली पार पडलेल्या काँग्रेस अधिवेशनाचा शताब्दी सोहळा एकाच वेळी केला जात असल्यामुळे बेळगाव या सीमावर्तीय जिल्ह्यातील उत्साह द्विगुणित झाला आहे. या दोन कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहराला नववधूप्रमाणे सजवले जात असून सुवर्ण विधानसौधची इमारत रंगीबेरंगी दिव्यांनी न्हाऊन निघाली आहे.
म्हैसूर येथील दसरा उत्सवाच्या विद्युत रोषणाची जबाबदारी सांभाळणाऱ्या पथकानेच बेळगाव येथील विद्युत रोषणाच्या सजावटीची जबाबदारी घेतली असून शहरातील राणी चन्नम्मा सर्कल, संगोळी रायन्ना सर्कल, श्री कृष्णदेवराय सर्कल, किल्ला तलाव सर्कल आणि शहापूर बसवेश्वर सर्कल या चौकासह शहरातील एकूण ९० चौकांची विद्युत रोषणाईच्या माध्यमातून तब्बल ८ कोटींच्या खर्चातून आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
काँग्रेसचे शतकमहोत्सवी अधिवेशन दि. 26 व 27 डिसेंबर रोजी बेळगावमध्ये होणार आहे. यानिमित्ताने काँग्रेस प्रभारी रणदीपसिंह सुरजेवाला आणि कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे गेल्या दोन दिवसांपासून बेळगावमध्ये तळ ठोकून आहेत. बेळगावमधील सुवर्णसौध येथे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हस्ते 27 डिसेंबर रोजी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत सुवर्ण सौधसमोर महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे.
या अधिवेशनासाठी विरोधी पक्षांचे नेते, खासदार, कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष आणि परिषदेचे अध्यक्ष, सर्व पक्षांचे आमदार आणि परिषद सदस्यांसह विविध पक्षांच्या नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
26 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या 1924 च्या अधिवेशनाचे ठिकाण असलेल्या बेळगाव येथील वीर सौधच्या आवारात महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण करतील. उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार नूतनीकरण केलेल्या फोटो गॅलरीचे उद्घाटन करतील. ज्यात गांधीजींची दुर्मिळ छायाचित्रे आहेत. या कार्यक्रमासाठी स्वातंत्र्यसैनिक आणि इतर नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. हे नेते 26 डिसेंबर रोजी बेळगावी येथील रामतीर्थ नगर येथे 1924 च्या अधिवेशनाचे आयोजन करण्यात मोलाचे योगदान देणारे काँग्रेस नेते आणि गांधीजींचे समकालीन गंगाधरराव देशपांडे यांच्या पुतळ्याचे अनावरण करतील.
तसेच माजी एआयसीसी सरचिटणीस यांच्या सन्मानार्थ स्मारक हॉलचे उद्घाटनही करतील. 26 डिसेंबर रोजी वीर सौधमध्ये काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होणार आहे.तर 27 डिसेंबर रोजी सीपीएड मैदानावर जाहीर सभा होणार आहे.
२६ डिसेंबर १९२४ साली राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली बेळगावमध्ये जे काँग्रेसचे अधिवेशन झाले होते, त्या अधिवेशनाला २६ डिसेंबर १९२४ रोजी, १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या शतकपूर्ती महोत्सवानिमित्त काँग्रेसच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. गांधी भारत या उपक्रमांतर्गत वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.