बेळगाव लाईव्ह : हारुगेरी पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांवर पॉक्सो कायद्यांतर्गत सुनावणी करण्यात आली असून आरोपीला सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
मनोरुग्ण असलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा आरोपी गुंडू भगवंत धुपदाळ (वय ५५, रा. मुगळखोड, रायबाग, जिल्हा बेळगाव) याला अटक करण्यात आली होती. त्याच्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याप्रकरणी सदर अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली असून सदर आरोपीची डीएनए चाचणी करण्यात आली असता, आरोपीवरील गुन्हा सिद्ध झाला आहे. याप्रकरणी पॉक्सो न्यायालय क्रमांक १, बेळगाव येथे खटला चालविण्यात आला.
न्यायाधीश श्रीमती सी एम पुष्पलता यांनी 21 साक्षीदार आणि 54 कागदपत्रे तपासल्यानंतर आणि पुराव्याच्या आधारे आरोपीला 20 वर्षे सक्तमजुरी आणि 10,000 रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.
तसेच पीडित अल्पवयीन मुलीला जिल्हा कायदा प्राधिकारतर्फे १ लाख रुपयांची भरपाईची देऊ केली आहे. याप्रकरणी सरकारी वकील म्हणून एल. व्ही. पाटील यांनी युक्तिवाद केला.