बेळगाव लाईव्ह: बेळगाव शहरात नाताळ सणाची जय्यत तयारी सुरू असताना येथील मेथोडिस्ट चर्चच्या आवारात कमिशन फॉर इक्यूमेनिझम आणि सेंट्रल मेथोडिस्ट चर्च, बेळगाव यांच्या सहकार्याने ऑल कर्नाटक युनायटेड ख्रिश्चन फोरम फॉर ह्युमन राईट्सद्वारे आयोजीत संयुक्तिक ख्रिसमस कार्यक्रम शहरातील विविध चर्चच्या धर्मगुरूंच्या उपस्थितीत बिशप डेरेक फर्नांडिस यांच्या अध्यक्षतेखाली धार्मिकतेने उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात विविध संप्रदायातील ख्रिश्चनांनी मोठी गर्दी केली होती.
सदर कार्यक्रमाची सुरुवात संध्याकाळी 6 वाजता प्रार्थनेने झाली आणि त्यानंतर ख्रिसमस कॅरोल आणि येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या कथेवर आधारित नृत्ये झाली. शहरातील विविध चर्च आणि शाळांशी संबंधित संघांनी इंग्रजी आणि कन्नड भाषेत ख्रिसमसवर आधारित कॅरोल्स, टेबल आणि गाण्यांचे प्रभावी सादरीकरण केले. बिशप डेरेक फर्नांडिस यांनी आपल्या भाषणात प्रभू येशू ख्रिस्ताच्या उपदेशाचा अर्थ सहमानवांमध्ये प्रेम पसरवणे हा असल्याचे सांगितले.
“देवाने जगावर इतके प्रेम केले की त्याने आपला एकुलता एक मुलगा या जगात पाठवला. अशा प्रकारे येशू ख्रिस्ताने प्रेमाच्या आज्ञांचा उपदेश केला. आपण आपल्यावर जसे प्रेम करतो तसे आपल्या शेजाऱ्यावर प्रेम करा कारण आपण आशेचे यात्रेकरू आहोत ” असे बिशप फर्नांडिस यांनी सांगितले. ते म्हणाले की, या ख्रिसमसला विशेष महत्त्व आहे कारण आम्ही लवकरच येशु ख्रिस्ताच्या जन्माच्या जयंती वर्षात प्रवेश करत आहोत.
ख्रिसमसच्या संयुक्तिक कार्यक्रमाची रात्री 9 च्या सुमारास सांगता झाली. यावेळी विविध संप्रदायातील ख्रिश्चन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. पास्टर आनंद रोट्टी, पास्टर चेरियन, फादर फिलिप कुट्टी, फादर प्रमोदकुमार, पास्टर चिल्लाल, क्लारा फर्नांडिस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
सदर कार्यक्रमात सेंट जोसेफ कॉन्व्हेंट, सेंट झेवियर्स हायस्कूल, मेथोडिस्ट चर्च, फातिमा कॅथेड्रल, वनिता विद्यालय हायस्कूल आणि बेळगावी शहरातील आणि आसपासच्या इतर चर्चमधील युवक आणि विद्यार्थ्यांनी भाग घेऊन आकर्षक सादरीकरण केले.