Thursday, December 5, 2024

/

गुंफण साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर

 belgaum

बेळगाव लाईव्ह  :साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक, पत्रकारिता आदी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सातारा जिल्ह्यातील गुंफण अकादमीच्या वतीने देण्यात येणाऱ्या गुंफण पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. पुरस्काराच्या मानकऱ्यांमध्ये चंद्रशेखर गावस, एल. डी. पाटील, राजीव मुळ्ये, संजय वेदपाठक आणि प्रकाश बेळगोजी यांचा समावेश आहे.

अकादमीचे अध्यक्ष व गुंफण परिवाराचे प्रमुख डॉ. बसवेश्वर चेणगे यांनी ही माहिती दिली. सीमा भागातील खानापूर (जि. बेळगाव) येथे २२ डिसेंबर रोजी होणाऱ्या विसाव्या गुंफण सद्भावना साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गोव्यातील प्रसिद्ध साहित्यिक व पत्रकार चंद्रशेखर गावस यांना यंदाचा गुंफण साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. दोन थेंबांचे आकाश हा काव्यसंग्रह तसेच माझी भावस्पंदने हा ललित लेखसंग्रह ही त्यांची पुस्तके विशेष गाजली आहेत. या पुस्तकांना चैतन्य शब्दांगण साहित्य गौरव पुरस्कार तसेच शांता शेळके साहित्य पुरस्कार लाभले आहेत. अखिल गोमंतक युवा मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. पुढारी व तरुण भारतमध्ये पत्रकार म्हणून काही काळ त्यांनी काम पाहिले होते. अभिनयातही त्यांनी चुणूक दाखवली आहे.

सीमा भागातील ग्रामजीवन समृद्ध करण्यासाठी योगदान देणारे बिदरभावी (जि. बेळगाव) येथील सामाजिक कार्यकर्ते एल. डी. पाटील यांची गुंफण सामाजिक पुरस्कारासाठी निवड केली आहे. शासनाच्या विविध योजना शेतकरी वर्गापर्यंत पोहोचवून त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी त्यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत. त्याचबरोबर महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी भरीव प्रयत्न केले आहेत.

Gunfan
सातारच्या रंगभूमीचा वारसा समृद्ध करण्यात मौलिक कामगिरी बजावणारे प्रसिद्ध रंगकर्मी व पत्रकार राजीव मुळ्ये यांना गुंफण सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. लोकरंगमंच नाट्यसंस्थेचे सदस्य असलेले राजीव मुळ्ये हे गेली चार दशके प्रायोगिक रंगभूमीवर सक्रिय आहेत. नाट्यलेखन, दिग्दर्शन, अभिनय आणि संगीत संयोजन या सर्वच बाबतीत त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. पत्रकारितेत तीस वर्षे त्यांनी योगदान दिले आहे.

कामगार चळवळ, साहित्य अशा विविध क्षेत्रात ठसा उमटवलेले पुण्यातील संवेदनशील सामाजिक कार्यकर्ते संजय वेदपाठक यांना गुंफण सद्भावना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पोस्ट खात्यातील कामगार संघटनेत बारा वर्षे विविध पदांवर कार्यरत राहिलेल्या वेदपाठक यांनी कवी म्हणूनही नावलौकिक मिळवला आहे. मुक्या जीवांसाठी त्याचप्रमाणे अनाथ मुलांसाठी उदार अंतःकरणाने, सढळ हाताने मदत करून त्यांनी त्यांच्यातील संवेदनशीलता दाखवून दिली आहे.

सीमाप्रश्न, बेळगावच्या मराठी माणसांचा आवाज महाराष्ट्रासह केंद्रापर्यंत पोहोचविण्याचे काम तडफेने करणारे सीमा भागातील बेळगाव लाईव्ह या मराठी डिजिटल न्यूज मीडिया हाऊसचे संपादक प्रकाश बेळगोजी यांना शंकर पाटील गुंफण पत्रकारिता पुरस्कार देण्यात येणार आहे. बेळगावमधील अनेक स्थानिक वर्तमान पत्रांमधून तसेच आयबीएन लोकमत, जय महाराष्ट्र, मी मराठी वाहिन्यांसाठी उत्तर कर्नाटक रिपोर्टर अशा विविध स्तरावरील पत्रकारिता गाजविणाऱ्या प्रकाश बेळगोजी यांना अलीकडेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने एकलव्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.