Wednesday, January 15, 2025

/

शेतजमीन परस्पर हडप, तिघा भावांवर फसवणुकीचा गुन्हा

 belgaum

बेळगाव लाईव्ह  : बनावट कागदपत्रे तयार करून तिघा भावांची जमीन परस्पर नावावर करून घेत हडप केल्याप्रकरणी तिघा भावांवर गुन्हा दाखल झाला आहे. मदभावी (ता. अथणी) गावच्या हद्दीत घडलेल्या या प्रकरणाची अथणी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
गुन्हा दाखल झालेल्या संशयितांमध्ये दौलतराव नरसिंगराव घोरपडे, खंडेराव नरसिंगराव घोरपडे व आनंदराव नरसिंगराव घोरपडे (तिघेही रा. मदभावी ता. अथणी) यांचा समावेश आहे. मूळ शेतमालक विष्णू बाबू बजबळे (वय 45 रा जक्करहट्टी, ता. अथणी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या तिघांवर भारतीय दंड विधान कलम 420 अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा अथणी पोलिसांनी दाखल करून घेतला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अथणी तालुक्यातील जक्करहट्टी येथील मारुती लिंबाजी बजबळे, आप्पासाहेब लिंबाजी बजबळे व बाबू लिंबाजी बजबळे या तिघांच्या नावावर सर्वे नंबर 623 /3 मध्ये गेल्या 70 वर्षांपासून 23 एकर 16 गुंठे जमीन आहे. उपरोक्त तिघा संशयितांपैकी दौलतराव घोरपडे याने अथणी तहसीलदार कार्यालयातील काही अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना हाताशी धरून जुन्या कागदपत्रांमध्ये फेरफार केले. बजबळे कुटुंबीयातील तिघा भावांच्या नावे प्रत्येकी 7 एकर 32 गुंठे जमीन होती. परंतु दौलतराव घोरपडे याने यातील प्रत्येकी 4 एकर 16 गुंठे यानुसार 13 एकर 8 गुंठे जमीन स्वतःच्या तसेच आपल्या अन्य दोघा भावांच्या नावे चढवून घेतली आहे. बसवले कुटुंबीयातील तिघा भावांच्या नावे सध्या फक्त 3 एकर 16 गुंठे शेतजमीन राहिली आहे.

एफआयआर मध्ये तक्रारदार विष्णू बजबळे यांनी म्हटले आहे की, काही महिन्यांपूर्वी दौलतराव घोरपडे याने आपल्या दोघा काकांना घरी बोलावून घेत तुमच्या शेत जमिनीची फोडी करून स्वतंत्र उतारा बनवून देतो, असे सांगत फसवून सह्या घेतल्या आहेत. माझ्या वडिलांचे निधन झाले असल्याने वारसदार म्हणून चौघा भावंडांची नावे उताऱ्यावर चढलेली आहेत.

शेत जमिनीच्या कागदपत्रावर कुठेही आम्हा भावांची सही नसताना आमच्या नावावरील शेतजमीनही परस्पर नावावर करून घेत आमची फसवणूक केली आहे. 70 वर्षे आपल्या कब्जात असलेली शेत जमीन परस्पर नावावर कशी झाली? याबाबत तहसीलदार कार्यालयात विचारणा केली असता
त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. आमच्या शेतजमिनीच्या गैरव्यवहाराची सविस्तर चौकशी करून दौलतराव घोरपडेसह तिघा भावांवर कारवाई करावी, अशी मागणी विष्णू बजबळे यांनी केली आहे.

घोरपडेवर फसवणुकीचा यापूर्वीही गुन्हा
सात वर्षांपूर्वी दौलतराव घोरपडे याने धोंडूबाई तुकाराम सरगर (रा. विष्णूवाडी ता. अथणी) या महिलेची 4 एकर 18 गुंठे शेतजमीन फसवून नावे करून घेतली होती. त्यावेळी दौलतराव घोरपडे याच्यासह अथणीचे तत्कालीन उपनोंदणी अधिकारी नायडू एम. के. या दोघांवर अथणी पोलीस ठाण्यात फसवणूक विश्वासघात बनावट कागदपत्रे तयार करणे यासह विविध कलमांतर्गत 20 मार्च 2017 रोजी गुन्हा (क्राईम नं. 0105/2017) दाखल झाला आहे. जगण्यासाठी परगावी गेलेल्या शेतकऱ्यांची जमीन परस्पर नावावर करून घेणारी भूमिफियांची टोळी अथणी तालुक्यात वावरत आहे. अशा टोळ्यांवर पोलीस व जिल्हा प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांतून होत आहे.

Athani
माझे दोन काका व आता आम्हा भावांच्या नावावर असलेली शेत जमीन सत्तर वर्षापासून आमच्या कब्जात असून ती आम्ही कसत आहोत. परंतु, उताऱ्यावरून अचानक तेरा एकर आठ गुंठे शेतजमीन गायब झाल्याने धक्का बसला आहे. दौलतराव घोरपडे याच्यासोबत तहसीलदार कार्यालयातील अधिकारी व कर्मचारीही यामध्ये सामील आहेत. आमची शेत जमीन लवकरात लवकर आमच्या नावे करून न दिल्यास अथणी तहसीलदार कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात लोकायुक्तांकडे लेखी तक्रार करणार आहे. गरज पडल्यास बंगळूर येथे जाऊन महसूलमंत्र्यांकडेही तक्रार दिली जाईल.
विष्णू बजबळे, फिर्याददार
फोटो

आम्ही निरक्षर असल्याने व वय झाल्याने व्यवहारातील काही कळत नाही. याचाच फायदा उठवत फोडी करून देतो असे सांगत दौलतराव घोरपडे याने मला व माझा भाऊ आप्पासाहेब यांना त्याच्या घरी बोलावून घेत आम्हाला फसवून कागदपत्रावर सह्या घेतल्या. उताऱ्यावरील शेती कमी झाल्यानंतर हा प्रकार आमच्या लक्षात आला. त्यामुळे आम्ही या प्रकरणी अथणी तहसीलदार, चिकोडी प्रांताधिकारी व जिल्हाधिकाऱ्याकडे लेखी तक्रार केली आहे. आमची जमीन आम्हाला परत मिळावी हीच अपेक्षा आहे.
मारुती बजबळे, फसलेले शेतकरी

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.