बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्याला आणखी एक मंत्रीपद मिळावे यासंदर्भात करण्यात आलेली मागणी आणि चर्चा याबाबत आपल्याला कोणतीही माहिती नाही, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. आज काँग्रेस भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी बोलताना मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले की, “आसिफ (राजू) सेठ यांनी मंत्रीपद मिळवण्याची मागणी केली आहे. पण या निर्णयाची माहिती मला नाही. मुख्यमंत्री सिद्धरामय्या, केपीसीसी अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री डी. के.. शिवकुमार यांना याबाबत विचारल्यासच रास्त ठरेल” असे त्यांनी स्पष्ट केले.
बेळगाव जिल्ह्याला दुसऱ्या राजधानीचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली असून याबाबत विचारले असता, सतीश जारकीहोळी म्हणाले, “हा क्षण लवकर येईल, पण त्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल.” असे ते म्हणाले.
केपीसीसी अध्यक्षपदाच्या बदलाबाबत त्यांनी सांगितले की, केपीसीसी अध्यक्षपदासाठी हायकमांड निर्णय घेईल आणि यासंदर्भात चर्चेची आवश्यकता नाही. पक्षाला तळागाळातील कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी पूर्ण कालावधीसाठी अध्यक्षपदाची धुरा सांभाळणारी व्यक्ती हवी” असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी काँग्रेस अधिवेशनाच्या शतक महोत्सवासंदर्भातही माहिती दिली. “1924 मध्ये बेळगावमध्ये झालेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या शंभर वर्षांनिमित्त कार्यक्रम आयोजित केला जात आहे. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचा तीन दिवसांत बेळगाव दौरा होणार आहे.
या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आयुक्त याडा मार्टिन मारबानियांग यांच्याशी चर्चा करून सूचना देण्यात आल्या आहेत. बेळगावमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस विभागाने योग्य पावले उचलावीत असे आदेशही देण्यात आले आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेत कित्तूरचे आमदार बाबा साहेब पाटील, बेळगाव बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे आणि केपीसीसीचे सचिव सुनील हणमन्नावर यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.