बेळगाव लाईव्ह :प्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुन ने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर बेळगावच्या शांताई वृद्धाश्रम सेकंड चाइल्डहूडच्या आजीनी बनवलेले एक रील पोस्ट केले आहे.
आघाडीचा अभिनेता आणि पुष्पा टू या चित्रपटामुळे गाजत असलेल्या अल्लु अर्जुन ने घातलेल्या स्टोरीमुळे आता शांताई वृद्धाश्रमाचे नाव आणखी पुढे जाऊन पोहोचले आहे.
शांताई मध्ये 40 आजी आजोबा राहतात. यांच्या जीवनात आनंद फुलवण्यासाठी वृद्धाश्रमाचे कार्याध्यक्ष विजय मोरे आणि त्यांची कन्या शरल मोरे यांच्या संकल्पनेतून आजी आजोबांचे रील बनवण्याचा उपक्रम राबवला जात आहे. शांताई सेकंड चाईल्डहूड या instagram खात्याच्या माध्यमातून हे रील पोस्ट केले जातात.
सध्या पुष्पा टू चित्रपटाबद्दलची चर्चा सर्वत्र सुरू आहे आणि या चित्रपटातील किसीक या गाण्याच्या संगीतावर आजीनी रील तयार केले. संबंधित रील आपल्या स्टोरीवर पोस्ट करून अभिनेता अल्लू अर्जुनने या रील चा गौरवच केला आहे.
नुकतेच झी सारेगामा कार्यक्रमामध्ये या आजींची वर्णी लागली होती. त्यानंतर आणखी एक मानाचा तुरा बेळगावच्या शांताई वृद्धाश्रमाच्या शिरपेचात खोवला गेला आहे.