बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये 25 डिसेंबर 1924 रोजी पार पडलेल्या काँग्रेस अधिवेशनाला यंदा 100 वर्षे पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक अधिवेशनाचे अध्यक्षपद महात्मा गांधी यांनी भूषवले होते.
या अधिवेशनाच्या स्मृतींना उजाळा देताना, त्या काळातील प्रेरणादायी घटनांच्या स्मृतींची पुनरावृत्ती करून देण्यासाठी बेळगावमध्ये शतकमहोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन काँग्रेसच्या वतीने करण्यात आले असून बेळगावचे रुपडेच या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पालटले आहे. यानिमित्ताने बेळगावमध्ये १९२४ साली पार पडलेल्या अधिवेशनाच्या स्मृतींना उजाळा….
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली बेळगावमध्ये भरलेल्या ऐतिहासिक काँग्रेस अधिवेशनाला यंदा 100 वर्षे पूर्ण होत आहेत. गांधी जयंतीच्या निमित्ताने या अधिवेशनाच्या स्मृतींना उजाळा देताना, बेळगावने या ऐतिहासिक क्षणांना आजही जपून ठेवले आहे. 1924 साली पार पडलेल्या काँग्रेसच्या 39 व्या अधिवेशनासाठी तुलनेने लहान असलेल्या या शहराची निवड होणे ही विशेष बाब मानली जाते.
1924 साली भरलेल्या या ऐतिहासिक काँग्रेस अधिवेशनाला महात्मा गांधीजी उपस्थित राहू नयेत, असा सल्ला अनेकांनी त्यांना दिला होता. मात्र, गांधीजींनी या अधिवेशनाला हजेरी लावली, याचे श्रेय कर्नाटक सिंह गंगाधरराव देशपांडे यांना जाते. ‘माझी जीवनकथा’ या आत्मचरित्रात त्यांनी या अधिवेशनाचा मान बेळगावला कसा मिळाला, याचा सविस्तर उल्लेख केला आहे. विजापूर आणि हुबळी येथे अधिवेशन भरवण्यासाठी मोठे प्रयत्न झाले होते, परंतु गंगाधररावांच्या अंतःप्रेरणेने जणू निर्णयच दिला.
स्थळ निश्चित होण्यापूर्वीच त्यांनी तयारी सुरू केली होती. बेळगाव व शहापूर येथील काही प्रमुख व्यापाऱ्यांशी त्यांनी संपर्क साधून 30,000 रुपयांची देणगी उभी केली, ज्यामुळे हा ऐतिहासिक उपक्रम शक्य झाला. याशिवाय, ठळकवाडी परिसरातील 50 हून अधिक बंगल्यांच्या मालकांनी आपले बंगले अधिवेशनासाठी उपलब्ध करून देण्याचे मान्य केले.
गंगाधरराव देशपांडे यांनी रेल्वे खात्याच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन हंगामी स्टेशन सुरू करण्याची विनंती केली. त्यावेळी जिल्हा काँग्रेस समितीचे चिटणीस भीमराव पोतदार आणि नगरपालिकेचे अध्यक्ष चौगुले यांनीदेखील याला जोरदार पाठिंबा दिला. त्यामुळे, हुबळी येथे झालेल्या बैठकीत बेळगावच्या विरोधात काही तीव्र मतप्रदर्शने झाली असली, तरी गंगाधरराव यांनी सादर केलेल्या तयारीचा आढावा निर्णायक ठरला. परिणामी, बैठकीतील बहुसंख्य सदस्यांनी एकमताने बेळगावची निवड केली.
गंगाधरराव देशपांडे यांनी महात्मा गांधींना पटवून दिले की हे अधिवेशन स्वातंत्र्य चळवळीसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरेल आणि या प्रदेशातील लोकांना चळवळीसाठी नवी ऊर्जा मिळेल. त्यामुळेच महात्मा गांधींनी या अधिवेशनाला उपस्थित राहण्याचे मान्य केले. यापूर्वी, 1916 साली गांधीजींनी बेळगावला भेट दिली होती. हे अधिवेशन बेळगावमध्ये आयोजित झालेले एकमेव अधिवेशन ठरले, ज्याचे अध्यक्षपद महात्मा गांधींनी भूषविले होते.अधिवेशनाच्या तयारीच्या वेळी जिल्ह्यातील पाच जणांनी नुकसान झाल्यास प्रत्येकी पाच हजार रुपये भरून देण्याची लेखी हमी दिली. कृष्णराव आणि जीवनराव याळगी बंधूंनी अधिवेशनासाठी सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले, ज्यामुळे तयारी जोरात सुरू झाली.
त्या काळी बेळगावमध्ये नळसुविधा नव्हती, तसेच घरोघरी पुरेशा विहिरी नव्हत्या. त्यामुळे अधिवेशनासाठी एक नवीन विहीर खोदण्यात आली, जी आज “काँग्रेस विहीर” म्हणून ओळखली जाते. दरम्यान, प्रांतिक काँग्रेस समितीने पुन्हा हुबळीला अधिवेशन भरविण्याचा आग्रह धरत बैठक बोलावली. तरीही बेळगावच्या बाजूने जोरदार तयारी आणि व्यापक पाठिंबा यामुळे शेवटी बेळगावलाच अंतिम मान्यता मिळाली.
अधिवेशनासाठी जागेचा आराखडा बी. कृष्णराव यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आला. महापालिकेने अधिवेशनाच्या पूर्वसिद्धतेत मदत करत रस्ते तयार करण्याचे काम स्वतःकडे घेतले, ज्यामुळे मोठा खर्च वाचला. बांबू, खांब आणि वासे कोणत्या जंगलात उपलब्ध होतील, याचा शोध घेतला गेला. तसेच, 1923 साली काकीनाडा येथे झालेल्या अधिवेशनातील तंबू बेळगावला मागवण्यात आले, ज्यामुळे मंडपाच्या खर्चात मोठी बचत झाली. दरम्यान, वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या आवाहनानंतर वल्लभभाई पटेल यांनी आर्थिक मदतीची गरज आहे का, अशी विचारणा केली. मात्र, गंगाधररावांनी विनम्रपणे ती मदत नाकारली. अधिवेशनाच्या यशासाठी पुंडलिकजी कातगडे, बाबुराव ठाकुर, कृष्णराव याळगी, आणि जीवनराव याळगी यांनी स्वयंसेवक म्हणून मोलाचे योगदान दिले.
पाहुण्यांची सोय करण्यासाठी खास घोडे मागवण्यात आले होते. हे स्वयंसेवक दिवसरात्र मेहनत करत अधिवेशन यशस्वी करण्यासाठी झटत होते. याशिवाय वसंतराव पोतदार, भीमराव कुलकर्णी आणि शंकरराव कुलकर्णी यांचे प्रयत्न देखील अतिशय महत्त्वाचे ठरले, ज्यामुळे अधिवेशनाची तयारी अधिक सुगम आणि प्रभावी झाली.
अधिवेशनात मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू, अॅनी बेझंट, सरोजिनी नायडू, चित्तरंजन दास, लाला लजपतराय, सरदार वल्लभभाई पटेल, पंडित मदनमोहन मालविया, सैफुद्दीन किचलेव, डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्यासह अनेक प्रतिष्ठित नेते सहभागी झाले होते. या महत्त्वपूर्ण अधिवेशनात भोजन व्यवस्थेची जबाबदारी वामन कलघटगी यांच्याकडे सोपविण्यात आली होती, जी त्यांनी अत्यंत कौशल्याने पार पाडली. त्यामुळे अधिवेशनाच्या यशात त्यांचे योगदानही महत्त्वपूर्ण ठरले. रेल्वे अधिकाऱ्यांनी मद्रास सदर्न मराठा रेल्वे विभागाच्या सहकार्याने अधिवेशन स्थळी असलेल्या टेकडीवर मोठ्या पाण्याच्या टँकर्सची व्यवस्था केली. गजाननराव देशपांडे यांनी टेबल आणि खुर्च्यांची सोय केली, तर खेमाजीराव गोडसे यांनी पाहुण्यांच्या निवासासाठी खोल्या उभ्या केल्या. याशिवाय, जीवनराव याळगी यांनी मुंबईहून छोटा जनरेटर आणून महात्मा गांधी यांच्या वास्तव्याच्या खोलीत दिव्यांची सोय केल.
अधिवेशनाला 30 हजारांहून अधिक लोक उपस्थित होते. याच अधिवेशनात गांधीजींनी ‘अहिंसा आणि असहकार’ याची घोषणा करून चरखा आंदोलनाला दिशा दिली. ऐतिहासिक स्मृती जतन करण्यासाठी 2001 मध्ये काँग्रेस विहिरीचा जीर्णोद्धार करून वीरसौधची स्थापना करण्यात आली. येथे स्वातंत्र्य चळवळ आणि अधिवेशनाशी संबंधित छायाचित्रे प्रदर्शित आहेत. तसेच छत्रपती शिवाजी उद्यानात महात्मा गांधी स्मारक उभारण्यात आले आहे.
खेमाजीराव गोडसे यांनी अतिशय कल्पकतेने आणि कौशल्यपूर्ण पद्धतीने पाहुण्यांच्या निवासासाठी खोल्या उभारल्या. विशेषतः महात्मा गांधी यांची खोली त्यांनी इतकी सुंदर बनवली की गांधीजींनी स्वतःच “धिस ईज नॉट हट, बट पॅलेस” असे कौतुकाने उद्गार काढले. अधिवेशनासाठी आलेल्या सर्व पाहुण्यांना दररोज मिरजहून चक्का मागवून श्रीखंड पुरीचे जेवण दिले जात होते, ज्यामुळे पाहुण्यांचे समाधान वाढले.
अधिवेशनाच्या वृत्तांकनासाठी आलेल्या पत्रकारांमध्ये भगतसिंग यांचा समावेश होता. त्यांच्या सोबत त्यांचे वडील किसनसिंगही होते. या अधिवेशनाच्या सोयीसाठी पहिले व दुसरे रेल्वेगेट यांदरम्यान हंगामी रेल्वे स्टेशन उभारण्यात आले, ज्याला फ्लॅग स्टेशन म्हणून ओळखले जाते. विशेष म्हणजे या रेल्वे डब्यात मराठी आणि तमिळ भाषेत “एका डब्यात 24 जणांनी बसावे” अशी सूचना लिहिण्यात आली होती, ही बाब विशेष चर्चेचा विषय ठरली.