बेळगाव लाईव्ह- येथील आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) च्या वतीने आयोजित करण्यात आलेली हरेकृष्ण रथयात्रा यंदा दि.1 व 2 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
शनिवार दि. 1 फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता धर्मवीर संभाजी चौक येथून या रथयात्रेस प्रारंभ होईल. देशाच्या विविध भागातून भक्तगण आणि जगाच्या विविध भागातून वरिष्ठ संन्यासी या रथयात्रेत सहभागी होतील.
बेळगाव, शहापूर आणि टिळकवाडीच्या विविध भागात फिरून ही रथयात्रा सायंकाळी साडेसहा वाजता इस्कॉन ग्राउंड वर पोहोचेल. तेथे सायंकाळी साडेसहा ते रात्रो साडेनऊ वाजेपर्यंत भजन, कीर्तन, प्रवचन व सर्वांसाठी प्रसाद होईल.
2 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेचार ते साडेपाच वाजेपर्यंत वैष्णव यज्ञ, त्यानंतर साडेसहा ते रात्री दहा वाजेपर्यंत भजन, कीर्तन, प्रवचन व सर्वांसाठी प्रसाद होईल.
अत्यंत उत्साहाने संपन्न होणाऱ्या या रथयात्रेच्या निमित्ताने विविध कमिट्यांची नियुक्ती करण्यात आली असून कार्यकर्ते तयारीला लागले आहेत. ही रथयात्रा म्हणजे बेळगावकरांचा एक उत्सवच असतो.