Friday, November 15, 2024

/

हिवाळी अधिवेशन : मनपा आयुक्तांनी घेतली हॉटेल मालकांची बैठक

 belgaum

बेळगाव लाईव्ह :कर्नाटक विधानसभेचे हिवाळी अधिवेशन पुढील डिसेंबर महिन्यात बेळगावमध्ये होणार असून या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी येणाऱ्या गणमान्यांच्या निवास व्यवस्थित त महापालिका आयुक्त शुभा बी. यांनी शहरातील हॉटेल मालकांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले.

सरकारच्या हिवाळी अधिवेशनानिमित्त बेळगावमध्ये येणाऱ्या गणमान्य व्यक्तींच्या निवास व्यवस्थेसाठी हॉटेल मालकांनी सहकार्य केले पाहिजे. अधिवेशनाच्या निमित्ताने बेळगावमध्ये येणाऱ्यांसाठी 68 हॉटेल्स आणि त्यांच्या 2200 खोल्यांची आवश्यकता आहे, असे आयुक्त शुभा बी. यांनी बैठकीत स्पष्ट केले.

यावेळी हॉटेल मालकांनी तक्रारींचा पाढा वाचताना डिसेंबर महिन्यात मुंज -लग्न समारंभ सुरू होत असल्यामुळे आमच्यासाठी चांगल्या व्यवसायाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा मौसम असतो असे सांगितले.

तसेच त्यामुळे अधिवेशनासाठी येणाऱ्यांकरता खोल्या उपलब्ध करणे कठीण जाणार असल्याची माहिती दिली. यासाठी पुढच्या वर्षी डिसेंबर महिना सोडून तत्पूर्वी अधिवेशन आयोजित केले जावे असा सल्लाही हॉटेल मालकांनी दिला.

दरवर्षी अधिवेशनासाठी हॉटेलमधील खोल्या भाडेतत्त्वावर देताना सवलतीचा दर दिला जातो. तथापि यावेळी नियमित ग्राहकांसाठी जो दर आकारला जातो त्या दरानुसार बिल दिले जावे, अशी मागणीही हॉटेल मालकांनी केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन आयुक्त शुभा यांनी अधिवेशनासाठी येणाऱ्या पाहुण्यांना खोल्या उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांची चांगली बडदास्त ठेवली जावी, अशी सूचना केली.

बैठकीस महापालिका आयुक्तांसह प्रशासन उपायुक्त उदयकुमार तळवार, आरोग्य अधिकारी डॉ. संजीव नांद्रे यांच्यासह अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते. अधिवेशनासाठी दरवर्षी ज्या हॉटेलमधील खोल्या भाडेतत्त्वावर घेतल्या जातात त्याच हॉटेल मालकांना बैठकीसाठी बोलवण्यात आले होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.