बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहर परिसरात थंडीचा जोर वाढताच नागरिकांची पावले उबदार गरम कपडे खरेदी करण्यासाठी दुकानांकडे वळली आहेत.
शहरात विविध ठिकाणी व्यवसायिकांनी गरम कपड्याची दुकाने थाटली आहेत. या दुकानांमध्ये हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध साहित्य ठेवण्यात आले असून स्वेटर, जॅकेट, कानटोपी घेण्यावर नागरिकांचा भर दिसत आहे.
बेळगाव शहर आणि ग्रामीण भागात थंडीचे आगमन झाले असून सायंकाळी व सकाळच्या सत्रांमध्ये तापमान घसरत आहे. ऊन असूनही दुपारी हवेत गारवा जाणवत असल्यामुळे नागरिकांनी ठेवणीतील उबदार कपडे बाहेर काढले आहेत.
हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर उबदार कपड्याने दुकाने सजली आहेत. नवनवीन डिझाईनच्या उबदार कपड्यांसह विविध फॅशनच्या मफलर व कानटोप्या खरेदी करताना नागरिकांची लगबग दिसत आहे.
थंडीपासून बचाव करण्यासाठी विविध प्रकारच्या गरम कपड्यांच्या खरेदीसाठी ग्रामीण भागातील लोक शहरांमध्ये येत आहेत. त्यामुळे उबदार कपड्यांच्या दुकानांसमोर ग्राहकांची वाढती गर्दी पहावयास मिळत आहे. रस्त्याशेजारी कपड्यांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनी देखील थंडीच्या पार्श्वभूमीवर उबदार कपड्याच्या विक्रीला प्रारंभ केला आहे. त्यांच्याकडे देखील ग्राहकांची गर्दी होत आहे.
अलीकडे ऑनलाईन कपडे घेण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. हिवाळ्यात लागणाऱ्या गरम कपड्यांची देखील ऑनलाईन खरेदी करण्यास नागरिक पसंती देत आहेत. यात युवा पिढीचा भरणा मोठा आहे मोबाईलवर आपल्या आवडीचे उबदार कपडेपाहून त्यांची खरेदी करण्याकडे त्यांचा कल वाढला आहे.