बेळगाव लाईव्ह :टिळकवाडी तिसऱ्या रेल्वे गेटसमोर ओव्हर ब्रिजखाली डी मार्टकडे जाणाऱ्या रस्त्यावर गेल्या कित्येक महिन्यांपासून पडलेला मोठा खड्डा एखादा गंभीर अपघात घडल्यानंतरच बुजवण्यात येणार का? असा संतप्त सवाल वाहन चालकांकडून केला जात आहे.
तसेच मृत्यूचा सापळा ठरू पाहणारा हा खड्डा ताबडतोब बुजवण्याची जोरदार मागणी केली जात आहे.
टिळकवाडी तिसऱ्या रेल्वे गेटसमोर ओव्हर ब्रिजखाली रस्त्यावरील डांबरीकरण उखडून भला मोठा खड्डा पडला आहे. त्यामुळे या रस्त्यावरून डी मार्ट च्या दिशेने जाणाऱ्या वाहन चालकांची मोठी गैरसोय होत असते. रस्त्यावरील खड्ड्याचे हे जीवघेणे विवर मृत्यूचा सापळा बनवू लागले आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून सुमारे 5 -7 फूट रुंदीचा हा धोकादायक खड्डा बुजवून रस्त्याची व्यवस्थित दुरुस्ती केली जावी अशी मागणी केली जात आहे. मात्र मध्यंतरी केलेले निकृष्ट दर्जाचे पॅचवर्कचे काम वगळता या खड्ड्याच्या ठिकाणी रस्त्याची चांगली शाश्वत दुरुस्ती करण्याकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे.
मोठा रुंद व खोल असणारा हा खड्डा रात्रीच्या वेळी पथदीप बंद पडल्यास गंभीर अपघाताला निमंत्रण देणारा, विशेष करून दुचाकी वाहन चालकांसाठी जीवघेणा ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तरी लोकप्रतिनिधींसह संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन रस्त्यावरील सदर खड्ड्याची तात्काळ दुरुस्ती करण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी या रस्त्याचा नेहमी वापर करणाऱ्या त्रस्त वाहन चालकांकडून केले जात आहे.