बेळगाव लाईव्ह:तिसरे रेल्वे गेट येथील ओव्हर ब्रिजवरील रस्त्यावर सापडलेले पैशाचे पाकीट भारतनगर, शहापूर येथील श्रीधर खन्नूकर यांनी प्रामाणिकपणे मूळ मालकाला सुखरूप परत केल्याची घटना आज सोमवारी दुपारी घडली.
याबाबतची थोडक्यात माहिती अशी, एस. एम. खन्नूकर असोसिएट्सचे श्रीधर मोनाप्पा खन्नूकर हे आज दुपारी आपली सर्व्हिसिंगला दिलेली गाडी आणण्यासाठी उद्यमबागकडे निघाले होते.
त्यावेळी त्यांना तिसरे रेल्वे गेट ओव्हर ब्रिज रस्त्यावर पडलेले एक पैशाचे पाकीट सापडले. मूळ मालकाला ते परत करण्यासाठी पाकीट तपासले असता त्यामध्ये पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, कॉलेजचे आयडेंटिटी कार्ड, थोडे पैसे वगैरे गोष्टी खन्नूकर यांना आढळून आल्या.
त्यावरून एखाद्या कॉलेज विद्यार्थ्यांचे हे पाकीट असल्याचे आणि तो विद्यार्थी येळ्ळूर गावातील असल्याचे समजले. तेंव्हा संबंधित विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये किंवा त्याला त्रास होऊ नये, या उद्देशाने श्रीधर खन्नूकर यांनी त्वरित येळ्ळूर येथील माजी ग्रा.पं. अध्यक्ष सतीश पाटील यांच्याशी संपर्क साधून त्यांना सापडलेल्या पाकिटाबद्दल माहिती दिली.
तसेच पाकिटात मिळालेल्या एका चिठ्ठी वरील मोबाईल क्रमांकावर त्या विद्यार्थ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर त्याला अनगोळ नाक्याच्या ठिकाणी बोलावून ओळख पटवून पैशाचे पाकीट त्याला सुखरूप परत केले.
त्या विद्यार्थ्यांने आपण तासभर झाला तिसरे रेल्वे गेट ओव्हर ब्रिज मार्गावर आपले पाकीट शोधत होतो असे सांगून श्रीधर खन्नूकर यांचे शतशः आभार मानले.