बेळगाव लाईव्ह :पायाभूत सुविधांच्या स्थितीचे मूल्यांकन करण्याच्या दृष्टिकोनातून बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार असिफ (राजू) सेठ यांनी नुकतेच फुलबाग गल्ली आणि देशपांडे गल्ली यासह फोर्ट रोड भागांचे विस्तृत सर्वेक्षण करून तेथील रहिवासी आणि व्यावसायिकांकडून त्यांना भेडसावणाऱ्या समस्या त्यांच्याकडूनच थेट जाणून घेतल्या. शहराच्या या प्रमुख भागातील आव्हाने समजून घेण्याबरोबरच नागरी सुविधा आणि पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी संभाव्य उपायांवर चर्चा करणे, हा या सर्वेक्षणाचा उद्देश होता.
स्थानिक नेते आणि महापालिका अधिकाऱ्यांसमवेत आमदार असिफ सेठ यांनी फुलबाग गल्ली आणि देशपांडे गल्ली या लोकप्रिय व्यावसायिक भागासह फोर्ट रोडवरील विविध ठिकाणांना भेट दिली.
सर्वेक्षणादरम्यान त्यांनी रस्त्यांची स्थिती, ड्रेनेज प्रणाली आणि परिसराच्या एकूण पायाभूत सुविधांचे परीक्षण करून तातडीची दुरुस्ती आणि सुधारणा आवश्यक असलेल्या भागांची नोंद घेतली.
आमदारांनी या भागातील दीर्घकाळची समस्या असलेला पादचारी मार्ग सुधारण्यावर आणि वाहतूक कोंडी सोडवण्यावरही लक्ष केंद्रित केले. पी. बी. रोड ओव्हरब्रिजजवळील दुकानमालकांशी झालेला संवाद हा आमदार सेठ यांच्या भेटीचा एक महत्त्वाचा पैलू ठरला. आमदारांनी व्यवसाय मालकांची भेट घेऊन वाहतूकीचा ओघ, पार्किंग आणि सुरू असलेल्या बांधकामाचा त्यांच्या दैनंदिन कामकाजावर होणारा परिणाम यासह त्यांना येणाऱ्या अडचणींबद्दल चर्चा केली.
यावेळी अनेक दुकानदारांनी रस्त्यावरील अडथळे आणि पार्किंगची अपुरी जागा यामुळे पायी जाणाऱ्यांची संख्या कमी झाल्याबद्दल चिंता व्यक्त केली. त्यामुळे आपल्या उदरनिर्वाहावर परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार असिफ सेठ यांनी दुकान मालकांना आश्वासन दिले की, त्यांच्या समस्या गांभीर्याने घेतल्या जातील आणि या समस्यांवर व्यावहारिक उपाय शोधण्यासाठी आपण महापालिका अधिकारी आणि वाहतूक पोलिसांसोबत काम काम करू. पायाभूत सुविधांचा विकास आणि व्यवसायाची वाढ हातात हात घालून चालली पाहिजे यावरही त्यांनी भर दिला. तसेच स्थानिक व्यवसायांच्या गरजा आणि परिसराचे एकूण शहरी नियोजन या दोन्हींचा समतोल राहिल याची आपण काळजी घेऊ, असेही आमदारांनी स्पष्ट केले.
आमदारांच्या दौऱ्याप्रसंगी स्थानिक रहिवासी आणि दुकानदार बहुसंख्येने उपस्थित होते. या सर्वांनी स्वतः पुढाकार घेऊन जनतेला भेटून त्यांच्याशी थेट संपर्क साधण्याच्या इच्छेचे कौतुक केले. सर्वेक्षणादरम्यान आमदार सेठ यांच्या भेटीप्रसंगी त्यांच्यासोबत आलेले स्थानिक नेते आणि महापालिका अधिकाऱ्यांनी नागरिक, दुकानदार, व्यावसायिकांनी उपस्थित केलेल्या समस्यांची तातडीने दखल घेतली जाईल. विशेषत: पायाभूत सुविधांच्या सुधारणा आणि व्यावसायिक समुदायाला येणाऱ्या अडचणी कमी करण्याच्या दृष्टीने निश्चितपणे कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
निवासी आणि व्यवसाय या दोन्ही क्षेत्रांतील भागधारकांसह फोर्ट रोडला दिलेली भेट बेळगाव उत्तर मतदारसंघात सुधारणा करण्याच्या आमदार असिफ (राजू) सेठ यांच्या सततच्या वचनबद्धतेवर प्रकाश टाकते. पायाभूत सुविधांच्या आव्हानांसाठी व्यावहारिक उपायांवर त्यांचे लक्ष आणि स्थानिक रहिवाशांशी संवाद मजबूत करण्याचे त्यांचे प्रयत्न त्यांच्या मतदारसंघातील लोकांची सेवा करण्याचा त्यांचा सक्रिय दृष्टिकोन दर्शवतात.